जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी वारकरी सांप्रदयाची ताकद ग्रामीण विकास केंद्र व लोकाधिकार आंदोलनासोबत जोडून मोठा लढा उभारू, असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प. कांताताई महाराज सोनटक्के यांनी केले.
ग्रामीण विकास केंद्र जामखेड संचालित निवारा बालगृह आयोजित महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. समता भूमी, मोहा फाटा, बीड रोड, जामखेड येथील निवारा बालगृहाच्या सभागृहात ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास बौद्ध महासभेच्या तालुकाअध्यक्ष सुरेखा ताई सदाफुलें, तरड गावच्या सरपंच संगिता ताई केसकर, ह. भ.प. सारिका ताई देवकाते, लोकाधिकार आंदोलनाच्या महिला जिल्हाध्यक्ष द्वारका ताई पवार, सुरेखा रत्नाकर सदाफुले, सारिका ताई आखाडे, गिरीजा बाई सदाफुले, कमल ताई गायकवाड, सिंधू ताई सदाफुले, सारिका ताई गायकवाड, सविता ताई शिंदे आदी महिलांचा ह.भ.प. कांता ताई सोनटक्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना ह.भ.प. कांताताई सोनटक्के म्हणाल्या की, माता जिजाऊ, माता रमाई, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, संत मिराबाई, संत जनाबाई यासारख्या महिलांनी आमच्यासाठी खूप कष्ट घेतले त्यामुळेच आम्हाला हक्काचे व्यासपीठ मिळते. ग्रामपंचायत सदस्यांपासून राष्ट्रपती पदापर्यंत सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. आणि यापुढेही राहतील त्यासाठी महिलांनी खूप शिकावे मोठे व्हावे व पुढे जावे.
सुरेखा ताई सदाफुले म्हणाल्या, आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला मोठ्या धाडसाने काम करीत आहे. व त्यांनी आपले कर्तृत्व विविध क्षेत्रात सिद्ध केले आहे. मुलगा हा वंशाचा दिवा असला तरीही मुलगी ही वंशाची पणती आहे. आणि ती दोन्ही घरी उजेड देण्याचे काम करते.
ॲड.डॉ. अरुण जाधव म्हणाले की, सर्व महापुरुषांना घडविण्यात त्याच्या माता भगिनींचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळेच आज महिलांना मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. आगामी काळात समाज परिवर्तनाचे काम करणारे व्यक्ती आणि विचारांसोबत राहून गोर गरीब कष्टकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या विचारांचा गाडा पुढे नेण्यासाठी समाजातील रणरागिनींनी सज्ज व्हावे. व महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा नायनाट करावा.
यावेळी द्वारका ताई पवार, ह.भ.प. सारिका ताई देवकाते यांचीही भाषणे झाली. भगवान राऊत यांनी प्रास्ताविक केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. दिपक माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिष पारवे, अजिनाथ शिंदे, विशाल जाधव, रवी अंधारे, संजय वारभोग, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर, संगीता केसकर, संतोष चव्हाण, दीपक माळी, राकेश साळवे, राजू शिंदे, गीता बर्डे आदींनी परिश्रम घेतले.