जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – ( सुदाम वराट)
पतीच्या निधनानंतर खचून न जाता दोन चिमुकल्यांना उच्च शिक्षण दिले कर्जाच्या थकबाकीमुळे पतसंस्था बंद पडली होती. पोलीस संरक्षण घेऊन थकबाकी वसूल केली व पुन्हा पतसंस्था जोमाने सुरू केली. तसेच शिवपट्टनम ग्रामीण शैक्षणिक संस्था काही स्वार्थी मतलबी लोकांनी ताब्यात घेतली दहा वर्षे न्यायालयीन लढा लढत शैक्षणिक संस्था ताब्यात घेतली आज भव्य दिव्य इमारत बांधण्यात आली असून अनेक विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. आज शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनात तालुक्यातील खर्डा येथील ज्योतीताई गोलेकर या जोमाने कार्य करत आहेत. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. पतीच्या निधनानंतर खचून न जाता समाजात एक आदर्श म्हणून कार्य करत आहेत. यातून इतर महिलांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा हे जामखेड शहरानंतर दुसर्या क्रमांकाचे शहर आहे. व्यापारी व ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे शहर धाराशिव, सोलापूर व बीड जिल्ह्य़ाच्या सरहद्दीवरील हे गाव आहे. १९९0 – ९५ च्या आसपास डाॅ. शिरीष गोलेकर पाटील हे नाव प्रतिष्ठीत होते पतसंस्था, शैक्षणिक संस्था व वैद्यकीय व्यवसायात यांचा चांगला दबदबा होता. १९ ९ ८ मध्ये अचानक डाॅ. शिरीष गोलेकर पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. व कुटुंब उघड्यावर पडले त्यावेळी त्यांची मुलगी चार वर्षांची व मुलगा दोन वर्षाचा होता. डाॅक्टरांचे निधन झाल्याने पतसंस्थेचे कर्ज घेतलेल्या अनेक लोकांनी आता पतसंस्था बुडणार म्हणून कर्ज भरण्यास टाळाटाळ केली. पतसंस्था बंद पडली. शिवपट्टनम शैक्षणिक संस्थाही काही लोकांनी आमच्या ताब्यातून काढून घेतली. मुले लहान होते. काय करावे काही कळत नव्हते त्याचवेळी राजमाता जिजाऊ यांचे चरित्र वाचण्यात आले. आणी मग ठरवले आता रडायचे नाही लढायचे हा मंत्र घेऊन कामाला सुरुवात केली पतसंस्था दोन वर्षापासून बंद होती. पोलीस बंदोबस्त घेऊन कर्जाची वसुली सुरू केली मोठ्या प्रमाणावर कर्ज वसूल करण्यात यश मिळवले पतसंस्था पुन्हा सुरू झाली. दोन वर्षे बंद असलेली पतसंस्था चालू करणे ही खुपच दुर्मिळ घटना होती. आज पतसंस्थेमार्फत अनेक बचत गटांना कर्ज पुरवठा करून महिलांना स्वतः च्या पायावर उभे केले आहे. वेळोवेळी महिलांचे मेळावे घेऊन आरोग्यविषयक, शैक्षणिक व व्यावसायिक दृष्ट्या मार्गदर्शन सतत सुरू असते. पतसंस्थेच्या आदर्श कार्याबद्दल थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते ज्योती गोलेकर यांचा सन्मान करण्यात आला.
डाॅ. शिरीष गोलेकर पाटील यांच्या निधनानंतर शिवपट्टनम ग्रामीण शैक्षणिक संस्था काही सदस्यांनी आम्हाला काढून टाकले व ताब्यात घेतली त्यासाठी दहा वर्षे न्यायालयीन लढा दिला. व दहा वर्षांपूर्वी ही संस्था परत ताब्यात आली आज देवदैठण या ठिकाणी शैक्षणिक संकुल असुन चांगली इमारत बांधण्यात केले आहे. व अनेक विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत.
पतीच्या निधनावेळी मुलगी चार वर्षांची तर मुलगा दोन वर्षाचा होता पितृ छत्र हरपले होते. पण मातृछत्राने त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. आज मुलगी मास मीडिया मध्ये पदवीत्तर शिक्षण घेतले असून दूरदर्शन मध्ये नोकरी करत आहे. तर मुलगाही इंजिनिअर झाला आहे.
पतीच्या निधनानंतर खचून न जाता कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वी पार पाडून न्यायालयीन लढे लढत संस्था ताब्यात घेतल्या पतसंस्थेची थकित कर्जवसुली करून बंद पडलेली पतसंस्था चालू केली त्यामुळे आज अनेक कुटुंबे या पतसंस्थेमुळे उभी आहेत. राजकारणातही आपलाचांगला ठसा उमटविला आहे. स्वतः ला महिला न समजता आज समाजातील महिलांपेक्षा एक आदर्श निर्माण केला आहे.
महिला दिनानिमित्त अशा कर्तुत्ववान महिलेला जामखेड न्युज तर्फे मानाचा मुजरा.