बापू तांबेंची धोबीपछाड, विरोधक झाले घायाळ – कायम ठेवीवर शिक्षक बँक देणार सव्वा आठ टक्के व्याज.

0
213
जामखेड प्रतिनिधी 
जामखेड न्युज – – – ( सुदाम वराट) 
      जिल्ह्यात सतत चर्चेत राहणारी व आपली शताब्दी साजरी करणाऱ्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने यावर्षी आपल्या सभासदांना कायम ठेवीवर सव्वा आठ टक्के एवढा विक्रमी व्याजदर देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या परवा झालेल्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे बँकेचे सभासद सत्ताधारी गुरुमाऊली मंडळावर जाम खूश झाले आहेत तर विरोधक मात्र पुरते घायाळ झाले आहेत. गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुमाऊली मंडळाकडे सध्या बँकेची सूत्रे आहेत. तांबे यांनी एवढा मोठा विक्रमी व्याजदर देण्यासाठी संचालक मंडळाला आदेश करून त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले. त्यांच्या या निर्णयामुळे बँकेच्या सभासदांना जवळपास 17 कोटी रुपयांचे वाटप ३१ मार्च रोजी होणार आहे. अशी माहिती जामखेड न्युजशी बोलताना जिल्हाध्यक्ष बापू तांबे व जिल्हाकार्याध्यक्ष किसन वराट यांनी सांगितले.
      कायम ठेवीवर एवढा आकर्षक व्याज मिळेल याची विरोधकांना देखील कल्पना नव्हती. संचालक मंडळाच्या या निर्णयाने विरोधक पुरते घायाळ झाले असून त्यांनी आता व्यक्तिगत निंदा नालस्ती करण्यावर जोर दिला आहे.यातूनच बँकेच्या एका पदाधिकाऱ्याची व संचालक मंडळाची वैयक्तिक बदनामी करणाऱ्या पोस्ट दुसऱ्या गुरुमाऊली या विरोधकाकडून पसरविल्या जात आहेत .
पाच वर्षांपूर्वी बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली मंडळाने बँकेच्या निवडणुकीमध्ये दैदिप्यमान यश मिळवले. सदिच्छा मंडळातून फुटून निर्माण झालेल्या तत्कालीन गुरुमाऊली मंडळांमध्ये चेहरा म्हणून माजी चेअरमन रावसाहेब रोहोकले यांना ज्येष्ठ या नात्याने पुढे करण्यात आले. त्याचबरोबर रावसाहेब सुंबे, आबा जगताप, संजय शेळके, कैलास चिंधे, बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे, राजू साळवे, संदीप मोटे, प्रवीण ठुबे, सलीमखान पठाण, पी डी सोनवणे, राम वाक्‌चौरे, विद्युलता आढाव, संगीता कुरकुटे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांच्या एकजुटीने गुरुमाऊली मंडळाचा विजय झाला. परंतु यशा बरोबर असूया देखील निर्माण झाली. काहींनी तांबे आणि रोहोकले यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. काही प्रमाणात ते यशस्वी देखील झाले.
रोहोकले हे निवृत्तीपर्यंत म्हणजे साडेतीन वर्ष बँकेचे चेअरमन राहतील असे संजय शेळके यांनी घोषित केले आणि त्याप्रमाणे साडेतीन वर्षे त्यांना चेअरमन ठेवण्यात आले. मात्र निवृत्तीनंतरही चेअरमन पद सोडण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यासाठी त्यांनी आपल्या  पाठीराख्यांना औरंगाबाद उच्च न्यायालयात पाठविले. ती केस सध्या सुरू आहे. बँकेच्या नियमानुसार त्यांचे सभासदत्व संपुष्टात आले आणि त्यांना नाईलाजास्तव पायउतार व्हावे लागले. रोहोकले यांच्या साडेतीन वर्षाच्या काळामध्ये बापूसाहेब तांबे हे मंडळाचे अध्यक्ष जरी असले तरी त्यांच्या अनेक सूचना डावलण्यात आल्यामुळे त्यांनी अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आणि सर्व कारभार हा रावसाहेब रोहोकले यांनी पाहिला.
      31 मे 2019 ला रोहोकले निवृत्त झाल्यानंतर बँकेची सूत्रे बापू तांबे यांनी आपल्या ताब्यात घेऊन आपल्या विश्वासातील पदाधिकारी निवडले. या पदाधिकारी निवडीच्या वेळीच गुरुमाऊली मंडळात फूट पडली. रोहोकले गटाने याचा जिल्हाभर अपप्रचार करून आता बँकेचे खरे नाही अशी हाकाटी सुरू केली. मात्र बापूसाहेब तांबे यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेने विरोधी गटाचे सर्व मनसुबे धुळीस मिळवून बँकेमध्ये अत्यंत आदर्श असा कारभार केला.सभासद आणि समाजाचा विश्वास संपादन करीत बँक प्रगतीपथावर नेली. मार्च 2016 ला बँकेच्या ठेवींची संख्या 581 कोटी होती. रोहोकले चेअरमन झाल्यानंतर त्यात वाढ होऊन 31 मे 2019 ला ठेवी 855 कोटीच्या झाल्या. म्हणजे रोहोकले यांच्या साडेतीन वर्षाच्या काळात बँकेत 274 कोटी रुपये ठेवीत वाढ झाली. पण त्या नंतरच्या दीड वर्षात बँकेच्या ठेवी प्रचंड वाढल्या आणि आता मार्चमध्ये बँकेच्या ठेवी अकराशे सोळा कोटी च्या आहेत. या दीडच वर्षात ठेवी मध्ये 261 कोटींची वाढ झाली.
     माझ्यानंतर बँकेचे काय होणार असा प्रचार रोहोकले गुरुजींनी सुरू केला होता. त्याला तांबे यांनी चोख उत्तर दिले आणि त्यांच्यापेक्षा अधिक चांगला कारभार करून सभासदांचा विश्वास संपादन केला. रोहोकले यांच्या काळात बँकेने साडेतीन वर्षात अर्धा टक्का कर्जावरील व्याजदर कमी केला होता. त्या नंतरच्या दीड वर्षांमध्ये तांबे यांनी कर्जावरील व्याजदरात एक टक्का कपात केली आणि येथे सुद्धा विरोधकांना चितपट केले.गेल्या दीड वर्षांमध्ये शिक्षक बँकेमध्ये कोणतीही नवीन खरेदी झालेली नाही. पाथर्डी शाखेचे काम रोहोकलेंच्या काळातच मंजूर करण्यात आले होते .ते पूर्ण केले गेले. कोणत्याही प्रकारचा इतर खर्च विद्यमान संचालक मंडळाने केला नाही.
बँक शताब्दीनिमित्त बँकेच्या सभासदांना आकर्षक घड्याळ वाटप करण्यात आले. घड्याळ भेट म्हणून देण्याचा निर्णय देखील रोहोकले यांच्या काळातच झाला होता. बँकेने थेट कंपनीकडून घड्याळ खरेदी केले. त्यामध्ये कोणताही मध्यस्थ नसताना आणि बाजारामध्ये ऑनलाईन किंमत जास्त असताना सदरची आकर्षक घड्याळं सभासदांना देण्यात आली. त्यावरून देखील रोहोकले गटाने संचालक मंडळाविरुद्ध रान पेटविण्याचा प्रयत्न केला. नको ते आरोप करून संभ्रम निर्माण करण्याचा देखील प्रयत्न झाला डी डी आर कडे तक्रार करण्यात आली . मात्र सभासदांनी दुकानात जाऊन व ऑनलाईन किंमती पाहून, घड्याळाचा दर्जा पाहून आपल्या शंका निरसन करून घड्याळाबद्दल समाधान व्यक्त केले.
 खरं म्हणजे गुरुमाऊली मंडळाने जिल्ह्यातील इतर विरोधी मंडळ असलेल्या सदिच्छा, गुरुकुल, इब्टा या मंडळांचा पराभव केला होता. खरे विरोधक ते होते. मात्र दीड वर्षापूर्वी झालेल्या फुटीमुळे गुरुमाऊलीच्या दोन्ही गटात जुंपली. आता विरोधी रोहोकले गट हा प्रामुख्याने सत्ताधारी गुरुमाऊली मंडळाचा प्रमुख विरोधक म्हणून पुढे आला आहे .
   रोहोकले यांनी साडेतीन वर्षे चेअरमन पद न सोडता पुन्हा या पदावर राहण्याचा अट्टाहास केल्याने इतर संचालक यांना संधी मिळू शकली नाही. म्हणून उर्वरित काळामध्ये सर्व संचालकांना संधी देण्यासाठी पदाधिकार्‍यांचा कालावधी कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय तांबे यांनी घेतला. विशेष म्हणजे त्याला सर्व संचालकांनी साथ दिली. दीड वर्षात चार वेळा पदाधिकार्‍यांच्या निवडी होऊन देखील तांबे गटात कोणतीही नाराजी दिसून आली नाही.सर्व संचालकांना दरवेळी विश्वासात घेऊन तांबे यांनी या निवडी केल्या आणि संचालकांनी सुद्धा त्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यामुळे संचालक मंडळामध्ये वादविवाद होतील, त्यांच्यात फूट पडेल असे मनसुबे रचणाऱ्या विरोधकांना येथे सुद्धा तोंड झोडून घेण्याची वेळ आली .
मागील दीड वर्षांमध्ये बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने सभासद हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये कर्ज मर्यादा पस्तीस लाख रुपयापर्यंत वाढविण्यात आली. पाच वर्षांपूर्वी बँकेची कर्ज मर्यादा दहा लाख रुपये होती. त्यातही कर्ज घेतल्यास वाटपाला पैसे नव्हते. परंतु नियोजनपूर्वक रोहोकले गुरुजी आणि त्यानंतर बापूसाहेब तांबे यांनी सभासद हित समोर ठेवून आज बँकेची कर्ज मर्यादा पस्तीस लाखापर्यंत केली. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात एकही दिवस बँकेचे कर्ज वाटप कोणत्याही कारणास्तव बंद राहिलेले नाही. सभासदांसाठी गृहकर्ज सुरू केले. शैक्षणिक कर्जाची सुविधा देखील निर्माण करुन दिली. कन्यादान योजनेद्वारे सभासदांच्या मुलींना लग्नाच्या वेळी अकरा हजार रुपये दिले जात होते. या योजनेचे स्वागत झाले. परंतु ज्यांना मुली नाहीत अशा सभासदांनी आमच्या मुलांनाही पैसे मिळाले पाहिजे अशी मागणी केली. म्हणून येत्या वार्षिक सभेत कन्यादान योजनेच्या नावात बदल करून शुभमंगल योजना या नावाने सभासदांच्या मुलांना देखील 11 हजार रुपये लग्नाच्या वेळी दिले जाणार आहेत. कोणत्याही सभासदाचा पहिला मुलगा किंवा मुलगी यांना हा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व सभासदांना याचा फायदा होणार असून कोणावरही अन्याय होणार नाही. या निर्णयाचे देखील जिल्ह्यात मोठे स्वागत करण्यात आले आहे. ठेवी वाढल्यामुळे कायम ठेवीची रक्कम कमी करून दरमहा 1900 रुपये ऐवजी एक हजार रुपये करण्यात आली आहे. असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ही बँक राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये लौकिकास पात्र ठरली आहे.
 बँकेतर्फे एखादा सभासद अचानक मयत झाल्यास त्याचे संपूर्ण कर्ज माफ करून त्याच्या वारसांना कुटुंब आधार योजना व बँकेच्या माध्यमातून 15 लाख रुपयांची मदत दिली जाते. देशातील ही योजना राबविणारी अहमदनगर शिक्षक बँक ही एकमेव आहे. आमदार कपिल पाटील यांनी बँकेच्या भेटीप्रसंगी या योजनेचे तोंड भरुन कौतुक केले. गुरुमाऊली मंडळातील फुटी मुळे जिल्ह्यातील इतर विरोधी मंडळांना आता बँकेच्या कारभाराबाबत प्रचार करण्याची गरज राहिली नाही.  गुरुमाऊली मंडळाच्या साडेतीन वर्ष आणि दीड वर्ष या कारभारावर आगामी निवडणूक आता होणार आहे. बापूसाहेब तांबे यांनी गेल्या दीड वर्षांमध्ये जवळपास सात आमसभा घेऊन जिल्ह्यातील सभासद आणि कार्यकर्ते जो निर्णय देतील त्याप्रमाणे बँकेत निर्णय प्रक्रिया राबवून सभासदांचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे. रोहोकले यांच्या साडेतीन वर्षांच्या काळामध्ये मंडळ आणि संघटनेमध्ये अतिशय मरगळ आली होती. त्यांनी कधी बैठका सुद्धा घेतल्या नाही. कार्यकारिणीत बदल केला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह निर्माण झाला.बँकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा आयोग संचालक मंडळाचा विरोध असतांना देखील केवळ आपले नाव व्हावे यासाठी दिला गेला त्यामुळे बँकेचे व्यवस्थापन खर्चात वाढ होऊन दरवर्षी पावणेदोन कोटी रुपयांचा बोजा वाढला.
 निवडणुकीत दिलेले आमसभेत निर्णय घेण्याचे आश्वासन बापूसाहेब तांबे यांनी पाळून एक वेगळा पायंडा निर्माण केला आहे. तांबे यांच्या नेतृत्वाखालील आदर्श कामकाज पाहून विरोधक देखील खासगी मध्ये त्यांच्या कामाचे व त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करीत आहेत.
चौकट
  रोहोकलेना बँकेत रस का?
सदिच्छा मंडळाकडून संचालक झाल्यानंतर  चेअरमन न केल्यामुळे रोहोकले यांनी सदिच्छा मंडळ सोडले. पुढे गुरुमाऊली मंडळात साडेतीन वर्षे चेअरमन राहिल्यानंतर पुन्हा मीच पाहिजे या हट्टापायी मंडळात फूट पडली. आता ते निवृत्त झालेले आहेत. तरी पण बँकेबाबत त्यांना खूप रस आहे. याचे कारण काय ? असा प्रश्न जिल्ह्यात विचारला जात असून त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात शिक्षक बँकेत कर्मचारी असल्याने त्यांचे हित जोपासण्यासाठी ही सर्व धडपड असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here