जामखेड न्युज——
तालुक्यातील साकत येथील आदर्श शिक्षक नवनाथ बहिर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत पर्यावरण जागृती व्हावी म्हणून गावात पन्नास वड व पिंपळाच्या झाडांची लागवड केली आहे. एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.

यावेळी आदर्श शिक्षक नवनाथ बहिर यांच्या वाढदिवसानिमित्त साकत येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, आदर्श शेतकरी अविन लहाने, ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट, विठ्ठल वराट, नागनाथ वराट, सेवा संस्थेचे संचालक गणेश वराट, महादेव वराट सर, लखुळ वराट, नागनाथ मुरूमकर, गणेश मुरूमकर, महादेव चिंतामण वराट, दादासाहेब वराट, नानासाहेब लहाने, दत्ता वराट, भरत वराट फौजी, माणिक वराट सर, अजित वराट, भाऊसाहेब पाटील वराट, भाऊसाहेब लहाने यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नवनाथ बहिर हे आदर्श शिक्षक आहेत सध्या ते पाटोदा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. आतापर्यंत त्यांच्या कलेतील योगदानाबद्दल विविध पुरस्कारानी ते सन्मानित झाले आहेत. खडूवर नक्षीकाम, फळावर नक्षीकाम, राष्ट्रपुरुषांची चित्रे तसेच विविध ठिकाणी अप्रतिम अशी रांगोळी या सह सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे बहिर सरांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
गावातील बस स्थानक परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जेसीबी च्या साहाय्याने खड्डे घेऊन वड व पिंपळाच्या झाडांची लागवड केली आहे तसेच या झाडांना संरक्षक जाळीही बसवली आहे. आणि झाडांच्या संरक्षणाची तसेच संगोपनाची जबाबदारी घेतली आहे यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच श्री साकेश्वर विद्यालयाच्या मैदानावरही पाच पाच झाडे लावून संरक्षक जाळीही बसवली आहे. अनेकजण वाढदिवसाला डिजे लावणे धांगडधिंगा करणे, नाचगाणी ठेवणे अशा अनावश्यक खर्चाला फाटा देऊन पर्यावरण जागृती व्हावी पुढच्या पिढीला योग्य संस्कार मिळावेत म्हणून असा आदर्श उपक्रम सुरू केला आहे. याबद्दल त्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.



