जामखेड न्युज——
राज्यातील शिक्षक भरतीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वत मोठी बातमी समोर आली आहे. एमपीएससीमार्फत शिक्षक भरती (Maharashtra TET Exam by MPSC) करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला देण्यात आला आहे. पुढील शिक्षक भरती एमपीएससीच्या माध्यमातून करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.

राज्यातील शिक्षक भरती एमपीएससीच्या माध्यमातून व्हावी, असा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी शासनाकडे पाठविला आहे. एमपीएससीचे शिक्षण सचिवही या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एमपीएससीमार्फत भरती प्रक्रिया करण्यासाठी नियमांमध्येही काही तांत्रिक बदल करण्याची गरज आहे. ‘महासरकार’ या ऑनलाईन न्युज पोर्टलने याबाबतची बातमी प्रकाशित केली आहे.
नियम बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सध्या सुरू असलेली शिक्षक भरती पूर्ण केली जाईल, असे शिक्षण आयुक्त सूरज मांधरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात शिक्षक भरती होणार आहे, ती शिक्षक भरती एमपीएससीच्या माध्यमातून घेण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असेल. सध्या राज्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाते. 2019 मध्ये 12 हजार शिक्षकांची मोठी शिक्षक भरती करण्यात आली. राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असताना शिक्षक भरतीची मागणी वारंवार केली जात आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती सुरू असताना अनेक तांत्रिक अडचणींमुळे भरती प्रक्रिया लांबली. त्यामुळे एमपीएससी सारख्या अनुभवी संस्थेमार्फत कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जात आहेत.