Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या खळबळजनक बातमी – तहसीलदारांच्या पथकावर वाळू माफियाचा डंपर अंगावर घालून जीवे मारण्याचा...

खळबळजनक बातमी – तहसीलदारांच्या पथकावर वाळू माफियाचा डंपर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न दोघांना अटक

0
301
जामखेड न्युज – – – – 
    कर्जत येथील तहसीलदार नानासाहेब आगळे व महसूल पथकावर वाळू माफियाने डंपर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तरीही तब्बल २२ किमी पाठलाग करून पथकाने डंपर पकडला आणि दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या पथकामध्ये तहसीलदार नानासाहेब आगळे, कामगार तलाठी डी एन केसकर, गणेश सोनवणे, अविनाश रोडगे, डी एम बिरुटे, संजय दुधभाते, अशोक नारोड, पोलीस कर्मचारी श्री पळसे, श्री नारुटे यांचा समावेश होता.या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
   याबाबत सविस्तर असे की, अवैध वाळू वाहतूक करणारा एक डंपर कापरेवाडी रस्त्याने येत असल्याची माहिती कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना गुप्त माहितीदाराकडून  मिळाली. यावरून त्यांनी तात्काळ महसूल विभागाचे भरारी पथकासह छापा टाकला. व अवैध वाहतूक करणारा डंपर पकडला. डंपर पकडल्यावर त्यावरील ड्रायव्हर लक्ष्मण भुजंग काळे रा. वालवड, ता. कर्जत व क्लिनर शुभम भाऊसाहेब मंडलिक रा. शितपूर ता. कर्जत यांनी मालकास फोन करून वाळूसह डंपर पकडल्याचे सांगितले. यावेळी मालकाने डंपर पळवून घेवून जा असे सांगितले. त्यानुसार डंपर ड्रायव्हर  व क्लीनर यांनी संगनमत करून तहसीलदार नानासाहेब आगळे व भरारी पथकावर अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न करून हुलकावणी देत डंपर शिंदेवाडी रोडने पळवून नेला.
मात्र तहसीलदार व कर्मचारी हे घाबरले नाहीत, त्यानंतरही  पथकाने तब्बल २२ कि.मी. डंपरचा पाठलाग केला.  ड्रायव्हर याने रस्त्याने भरधाव वेगाने डंपर चालवला, पाटलाग करणारे तहसीलदार व दुचाकीवरील कर्मचारी त्या डंपरच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना तो डंपर त्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाडी चालवून पुढे जाऊ देत नव्हता. अशाही परिस्थितीत पथकाने जीव धोक्यात घालून रस्त्याच्या कडेने गाडी डंपरच्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी त्याठिकाणी देखील पुन्हा हुलकावणी दिली. अखेर कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी गावाच्या फाट्यावर काही नागरिकांनी हा डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्यांना देखील हुलकावणी दिली आणि तसाच न थांबता पुढे निघून गेला. टाकळी गावाच्या परिसरात रस्त्यावर काम सुरू असल्यामुळे रस्त्यावर पाईप पडलेले होते यामुळे अडथळा निर्माण झाला होता त्या ठिकाणी तहसीलदार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या डंपरला त्यांची गाडी आडवी उभा केली आणि डंपर पकडला.
दरम्यान त्या ठिकाणी ग्रामस्थही पाटलाग करत पोहोचले आणि या सर्वांनी ड्रायव्हर व क्लिनर यांना चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी कर्जत पोलिस स्टेशनमध्ये ड्रायव्हर  व क्लीनर यांना अटक करण्यात आली असून यांच्या विरोधात व डंपर मालक विनोद उर्फ आबा कदम राहणार माहीजळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!