Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या राष्ट्रवादी शिवसेनेचा गेम करत आहे हे षडयंत्र मुख्यमंत्र्यांनी ओळखावं’ – खासदार...

राष्ट्रवादी शिवसेनेचा गेम करत आहे हे षडयंत्र मुख्यमंत्र्यांनी ओळखावं’ – खासदार डॉ सुजय विखे-पाटील

0
241
जामखेड न्युज – – – – 
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सहाव्या जागेसाठी चुरस दिसून आली. पुरेसे संख्याबळ नसतानाही शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्या विरोधात भाजपने धनंजय महाडीक यांना उमेदवारी दिली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चाणाक्ष खेळी करत महाडीक यांना निवडून आणले आणि मोठा राजकीय भूकंप घडवला. या धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडीची मते फुटल्याची चर्चा सुरू असतानाच नगर दक्षिणचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी शिवसेनेचा गेम राष्ट्रवादी काँग्रेसनेच केल्याचा घणाघाती आरोप केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यसभेच्या निकालाबद्दल अपक्षांना दोष देण्यापेक्षा शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या मताधिक्याकडे पहावे. या निकालावरून राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार हे माझं भाकीत खरं ठरताना दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडीत सुखी आहेत. मात्र, सामान्य शिवसैनिकांसह आमदार खासदार दुःखी आहेत. येणाऱ्या विधान परिषदेतही शिवसेनेची नामुष्की होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हे सगळं षडयंत्र ओळखावे. माझ्या आजोबांपासून शिवसेनेशी आमचे संबंध आहेत. त्यामुळे मला शिवसेनेबद्दल सहानुभूती आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पासून सावध रहाण्याची गरज असून राष्ट्रवादी काँग्रेस हा खेळ करणारा पक्ष आहे, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले.
केंद्रीय तपास यंत्रणेच्या दबावामुळे भाजपचा विजय झाल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा सुजय विखे यांनी समाचार घेतला आहे. पराभव होतो तेव्हा अनेक कारणं शोधली जातात, असे संजय राऊत स्वतः म्हणतात. त्यामुळे त्यांनी एवढ्या लांब जाण्यापेक्षा राष्ट्रवादीशी चर्चा करायला हवी. त्यांनी असे का केले याचा जाब विचारायला हवा. ते दिलखुलासपणे सांगतील त्यांनी हे का केले. पवार साहेबांनी देखील निकाल धक्कादायक नसल्याची प्रतिक्रीया दिली आहे. म्हणजे त्यांना हे अपेक्षित होतं याचा विचार शिवसेनेने करणे गरजेचे असल्याचे सुजय विखे यांनी म्हटले.
राज्यसभेसाठी आमचे गणित पक्के झाले असून चारही जागेवर महाविकास आघाडीचा विजय होईल, असा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता. मात्र, शिवसेनेच्या कोट्यातील चौथी जागा आघाडीला गमवावी लागल्याने खा. सुजय विखे यांनी थोरातांवर निशाणा साधला आहे.महसूलमंत्र्यांचे बदल्यांमध्ये आणि वाळूच्या ठेक्यात गणित पक्कं आहे. त्यांना वाटलं राज्यसभेचं गणितही तसंच आहे. त्यामुळे आता महसुलमंत्री कन्फ्यूज झाले. राजकारणाचं आणि बदल्यांचे गणित वेगळे असते. २० तारखेला विधान परिषद निवडणुकीत गणिताची ते सुधारणा करतील असा खोचक टोला सुजय विखे-पाटील यांनी यांनी थोरातांना लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!