जामखेड न्युज – – – –
कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यातल्या दुष्काळी भागातही जोरदार पाऊस पडला आहे. जत तालुक्यातल्या दुष्काळी पूर्व भागामध्ये तुफान असा पाऊस पडला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहेत. तर ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर येथील मंदिरात पाऊसामुळे जलमय झाल्याने गुडघाभर पाण्यातून भक्तांनी प्रदक्षिणा घालण्याची वेळ आली आहे. तर वळसंग पासून इतर गावांना जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले आहे.
ADVERTISEMENT 

तीर्थक्षेत्र असणाऱ्या गुड्डापुर मंदिरात पाणीच पाणी झाले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे आणि भाविकांची नेहमीच येथे गर्दी असते. या ठिकाणीही मुसळधार पाऊस पडल्याने गुडघाभर पाणी मंदिर परिसरात साचले आहे.
दुष्काळी जत तालुक्यातही गेल्या बारा तासापासून मान्सूनपूर्व धुवाधार असा पाऊस पडत आहे, पूर्व भागात पावसाची संततधार ही अद्याप कायम आहे. गेल्या अनेक वर्षातील हा सर्वात मोठा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे सांगण्यात येत आहे. या पावसाने कोकणची अनुभूती येत आहे.
तालुक्यात सर्वत्र हा पाऊस सुरूच असून बहुतांशी ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे वळसंग ते सोर्डी, वळसंग ते कोळीगिरी, रस्ता पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद झाला आहे. तसेच उमराणी, बिळुर, मुचुंडी, शेगाव, वाळेखिंडी ,जत शहर आदी भागात जोरदार पाऊस झाला आहे.