आनंदाची बातमी! यंदा मान्सून १० दिवस लवकर; कोकण-मुंबईत कधी दाखल होणार?

0
221
जामखेड न्युज – – – – 
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तप्त झळा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सून भारतात १० दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर पॉडकास्ट संस्थेकडून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलांमुळे मान्सून (Monsoon) भारतात लवकर दाखल होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लवकरच उष्णतेच्या तडाख्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.
‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर’च्या अंदाजानुसार साधारण २० ते २१ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होईल. त्यानंतर २८ ते ३० मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. गेल्यावर्षी केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, चक्रीवादळामुळे केरळमधील मान्सूनचे आगमन ३ जूनपर्यंत लांबणीवर पडले होते. त्यामुळे आतादेखील सर्व परिस्थिती सुरळीत राहिल्यासच मान्सून २८ मे पर्यंत केरळमध्य दाखल होईल. त्यानंतर मान्सून भारताच्या इतर भागांच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करेल.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचे नवनवे उच्चांक गाठले जात आहेत. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या १२२ वर्षांती उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मान्सूनचे लवकर आगमन होणे, हा मोठा दिलासा ठरेल. मान्सूनचा पाऊस (Rain) तळकोकणात कधी दाखल होणार, याचा अंदाज अद्याप हवामान खात्याने जाहीर केलेला नाही. मात्र, मान्सूनचा आजवरचा साधारण प्रवास लक्षात घेता केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मान्सून ७ जूनपर्यंत तळकोकणात दाखल होऊ शकतो. त्यानंतर चार दिवसांत म्हणजे ११ जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो.
भेंडवळची भविष्यवाणी, राज्यात सर्वसाधारण पावसाचा अंदाज
भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार यंदा महाराष्ट्रात सर्वसाधारण पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जून महिन्यात कमी पाऊस, जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मात्र, शेतकऱ्यांना वर्षभर अवकाळी पावसाचाही सामना करावा लागेल, असे भाकीतही वर्तविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here