जामखेड न्युज
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणांवरून जामखेड तालुक्यातील आपटी येथील बाबासाहेब जगदाळे यांचा खुन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जामखेड पोलीसांनी खुनाच्या घटनेनंतर अवघ्या दोन तासांत आरोपी छगन बबन गोरे यास अटक केली आहे.
जामखेड तालुक्यातील आपटी येथे खुनाची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत फिर्यादी देवरथ गंगाराम मिसाळ,वय-४० वर्षे,धंदा-शेती शिक्षण-०८ वी जात हिंदु-मराठा रा.आपटी यांनी जामखेड पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,
आज दिनांक १९/०४/२०२२ रोजी सकाळी ०९/१५ वा.चे सुमारास मी आमचे घरी असताना माझी बायको रोहिणी हिने मला सांगितले की, आपल्या घरातील साखर संपलेली आहे,साखर घेवुन या. असे सांगितल्याने मी पायी/चालत ०९/३० वा.चे सुमारास आमचे आपटी गावातील बसस्टॅन्ड जवळ असलेले रामभाऊ गोरे यांचे किराणा दुकानात साखर घेण्यासाठी गेलो. मी किराणा दुकानात साखर घेत
असताना मला किराणा दुकाना समोर आपटी ते पिंपळगाव असे जाणाऱ्या डांबरी रस्त्याकडुन आरडाओरडयाचा आवाज आल्याने मी थोडे पुढे जावुन पाहिले असता त्या ठिकाणी डांबरी रस्त्यावर आमचे गावातील राहणारा छगन बबन गोरे हा माझे सासरे बाबासाहेब महादेव जगदाळे यांना “तु मला दारु पिण्यासाठी पैसे दे.” असे मोठ-मोठयाने म्हणुन त्यांना धक्काबुक्की करीत होता. त्यावेळी माझे सासरे हे छगन गोरे यांस “माझ्या कडे पैसे नाहीत.” असे सांगत असताना छगन गोरे याने माझे सासरे बाबासाहेब
जगदाळे यांना हाताने उचलुन डांबरी रस्त्यावर खाली आपटले.त्यामुळे माझे सासरे मोठयाने ओरडले.
त्यावेळी मी माझे सासरे यांना वाचविण्यासाठी पुढे जात असतानाच छगन गोरे याने माझे सासरे बाबासाहेब जगदाळे यांना परत त्याचे हातांनी उचलुन त्यांना डोक्याच्या बाजुने डांबरी रस्त्यावर आपटले. त्यामुळे माझे सासरे डोके फुटून,डोक्याला चिर पडुन रक्त येवुन जाग्यावर निपचित पडले. त्यावेळी किराणा दुकानदार रामभाऊ गोरे,तानाजी विष्णु गोरे,माझा मेव्हणा दिपक जगदाळे व गावातील इतर लोक त्या ठिकाणी पळत आले. त्यामुळे छगन गोरे हा त्या ठिकाणा वरुन पळुन गेला. त्यावेळी मी माझे सासरे यांचेजवळ जावुन त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला परंतु ते
आचक्या देत असल्याने मी किराणा दुकानातुन पाणी आणुन पाजले परंतु त्या वेळी माझे सासरे यांचा
जीव गेलेला होता.
त्या नंतर गावचे पोलीस पाटील यांनी घडलेली घटना जामखेड पोलीस स्टेशनला कळविल्यावर पोलीस अधिकारी व अंमलदार असे त्या ठिकाणी आले. त्यानंतर माझे सासरे यांची बॉडी जामखेड येथील सरकारी दवाखान्यात आणलेली असुन डॉक्टरांनी तपासुन ते मयत झाल्याचे सांगितलेले आहे. तरी दिनांक १९/०४/२०२२ रोजी ०९/३० वा.चे सुमारास आपटी ता.जामखेड गावात, रामभाऊ गोरे यांचे किराणा दुकाना समोर,आपटी ते पिंपळगाव असे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर छगन बबन गोरे
रा.आपटी ता.जामखेड याने माझे सासरे बाबासाहेब महादेव जगदाळे,वय-६५ वर्षे,रा.आपटी ता.जामखेड
यांना दारु पिण्यासाठी पैसे मागुन,धक्काबुक्की करुन ते दारु पिण्यासाठी पैसे देत नाहीत या कारणवरुन
त्यांना जिवे ठार मारण्याच्या उददेशाने दोन वेळा हातांनी उचलुन डांबरी रस्त्यावर डोक्याच्या बाजुने खाली
आपटुन त्यांना जिवे ठार मारुन त्यांचा खुन केलेला आहे. अशी फिर्याद दिलेली आहे.
खुनाची घटना कळताच जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी चार पथके तैनात केले असता नान्नज येथे घटनेनंतर २ तासात ताब्यात घेण्यात यश मिळाले.
यासाठी पोनि संभाजीराव गायकवाड, सपोनि सुनील बडे, पोऊनि राजू थोरात यांचेसह पोना शेंडे, पोना अविनाश ढेरे, पोना जाधव, पोशि म्हस्के, पोशि पवार, पोशि आवारे यांचा पथकात समावेश होता.
घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव सो यांनी भेट दिली. मा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ त्रिपाठी , उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव सो यांचे मार्गदर्शनाखाली तपास सपोनि सुनील बडे करीत आहेत.