जामखेड न्युज – – –
बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यात खळबळजनक घटना समोर आलीय. पहिले दोन अपत्य (children) असताना देखील महिलेने लग्नाळू तरुणासोबत 2 लाख रुपयांसाठी लग्न (Marriage) केलं. दोन लाख रुपये मिळवल्यानंतर लग्नाच्या दहाव्या दिवशी माहेरी जाते म्हणून लुटारू नवरीने (bride) तिथून धूम ठोकली. राज्यात लुटारु नवरीच्या एक ना अनेक घटना समोर येत आहेत. बीडमधील संबंधित घटनेमुळे खळबळ उडाली आहे. लग्नाच्या नावाने फसवणूक करणारं मोठं रॅकेट बीडमध्ये नव्हे तर राज्यात सक्रिय असल्याची चर्चा आहे.
आरोपी नवरीचं नाव रेखा बाळू चौधरी असं आहे. ती औरंगाबादच्या जाधववाडी येथील आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील, कृष्णा फरताळे, या लग्नाळू तरुणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सालवडगावच्या, रामकिसन जगन्नाथ तापडीया या एजंटने रेखा चौधरीचे स्थळ आणले होते. यावेळी लुटारू नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चार जणांनी 2 लाख देत असाल तर लग्न करू असं फरताळे कुटुंबियांना सांगितले. फरताळेंनी ही अट मान्य करत रेखा चौधरी हिच्यासह इतर मंडळींना रोख 60 हजार रुपये आणि 1 लाख 40 हजाराचा चेक दिला. त्यानंतर गेवराईच्या बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात 20 जुलै 2021 रोजी त्यांचा लग्न समारंभ देखील पार पडला.
या दरम्यान दिलेला चेक आठ दिवसांत विड्राल होताच, लुटारु नवरी रेखा ही येती जातीला म्हणून माहेरी गेली. त्यानंतर नवरदेव असणारा कृष्णा तिला आणायला गेला. मात्र तिने पहिल्यांदा कोरोना झालाय, असं कारण दिलं. तर पुन्हा आणायला गेला तर त्याला, एक ना अनेक कारण देत ती परत आलीच नाही. त्यानंतर काही दिवसांनी तिचा मोबाईल बंद झाला.
विशेष म्हणजे या दरम्यान नवरा मुलगा तिला आणायला गेल्यानंतर, तिचा आठ वर्षापूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीशी विवाह झाला असून त्यांना 2 अपत्य देखील असल्याचे कळल्याने त्यांना धक्काच बसला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचे स्थळ आणलेले रामकिसन जगन्नाथ तापडीया यांना संपर्क साधला. मात्र त्याने “तुम्हाला काय करायचे ते करा, कोठे फिर्याद द्यायची ती द्या” म्हणत फोन कट केला.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्याने नवरदेव मुलगा कृष्णा फरताळे याच्या फिर्यादीवरून संतोष विश्वनाथ शिंदे, सुनिता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी, रामकिसन जगन्नाथ तापडीया आणि विठ्ठल किसन पवार या पाच जणांविरुद्ध बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात कलम 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.