Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणांवर लावलेला सात ते आठ वर्षे गॅरंटी असलेला वज्रलेप...

रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणांवर लावलेला सात ते आठ वर्षे गॅरंटी असलेला वज्रलेप दोन वर्षांतच निघाला

0
361
जामखेड न्युज – – – – – 
बाप आणि आई, माझे विठ्ठल रखुमाई…लाखो भाविकांचा असा भाव ज्याच्यावर आहे, त्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या सुरक्षेसाठी दोन वर्षांपूर्वी वज्रलेप केला. परंतु, रुक्मिणी मातेच्या चरणांवरील वज्रलेप आताच निघू लागला आहे. २३ व २४ जुलै २०२० रोजी केलेला वज्रलेप सुमारे ८ वर्षे टिकेल, असे सांगितले होते. परंतु रुक्मिणी मातेच्या चरणांवरील वज्रलेप निघाल्याचे दिसून आले. त्यामुळे रुक्मिणी मातेच्या चरणांवर लीन होताना ‘माते आम्हाला माफ कर…’अशीच प्रार्थना वारकरी करीत आहेत.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठुरायाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप करण्यात आला होता. आतापर्यंत चार वेळा पुरातत्त्व विभागाकडून मूर्तीवर हे विविध प्रकारच्या रसायनांचे लेपन करण्यात आले होते. मात्र, दोन वर्षात रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेप निघू लागला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने दोन वर्षे पदस्पर्श दर्शन पूर्णपणे बंद होते. याच काळात २३ आणि २४ जुलै २०२० रोजी पुरातत्त्व विभागाने विठ्ठल मूर्तीवर आणि रुक्मिणी मातेच्या पायावर सिलिकॉनचा लेप दिला होता. तो ७ ते ८ वर्षे तसाच राहील, असा दावा करण्यात आला होता. परंतु दोन वर्षांनंतर गुढीपाडव्याला पुन्हा श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनास सुरुवात झाली आणि आता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
मूर्तीची झीज होत असल्याने पंचामृत अभिषेक बंद केला होता. रुक्मिणी मातेची मूर्ती शाळीग्राम दगडाची असून ती अतिशय गुळगुळीत आहे. या पायावर दरवेळी वज्रलेप केला जातो. आता वज्रलेपाचे तुकडे पडले आहेत.
यापूर्वीही लेपन…श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे संवर्धन होण्यासाठी १९९८, २००५, २०१२ आणि चौथा वज्रलेप २३ जुलै रोजी पुरातत्त्व विभागाचे उपाधीक्षक आणि रसायनशास्त्र तज्ज्ञ श्रीकांत मिश्रा यांच्या टीमने पूर्ण केला आहे.
मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधला आहे. तज्ज्ञ मंडळीशी चर्चा करून दोन्ही मूर्ती संवर्धनासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील.- गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!