जामखेड न्युज – – – –
मागील काही दिवसांपासून शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरून अनेक चर्चा सुरु आहेत. यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेकवेळा टोलेबाजीही झाली आहे. मात्र आता शिक्षक भरती संदर्भात राज्य सरकारने (Maharashtra Govt.) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जिथे शिक्षक कमी आहेत तिथे शिक्षकभरती केली जाणार असून अतिरिक्त असतील तिथे त्यांचं समायोजन केलं जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. आज सभागृहात त्यांनी ही घोषणा केली आहे. याच महिन्याभरात या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT

अनेक दिवसांपासून हा शिक्षक भरती रखडली असल्याने अनेकवेळा शिक्षकांकडून आंदोलने झाली. संबंधित अनेक संघटनांनी मोर्चे काढले मात्र तरीही राज्यसरकारला जाग येत नसल्याने विरोधकांनी राज्यसरकारला धारेवर धरलं होतं. मात्र आता या घोषणेमुळे शिक्षकांत पुन्हा एकदा उत्साहाते वातावरण पसरले आहे. दरम्यान, येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये सीटीटीव्ही (CCTV) कॅमेरे लावणार असल्याची घोषणाही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे. राज्यातील शासकीय शाळेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय शाळेत वर्षभरात टप्प्या टप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. राज्यात एकूण 65 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.