Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या उत्तरप्रदेश : भुकेचे राजकारण ? – प्रा. डॉ. बाळासाहेब पवार

उत्तरप्रदेश : भुकेचे राजकारण ? – प्रा. डॉ. बाळासाहेब पवार

0
264
जामखेड न्युज – – – – 
     आपल्या देशात सातत्याने कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुका चालू असतात. विकासात्मक, धोरणात्मक गोष्टी करण्यापेक्षा जास्तीत जास्त वेळ  निवडणूकीत व्यस्त राहण्यात आणि सभा संमेलनात जाताना दिसतो. त्यावर विश्लेषण करण्याची घाईसुद्धा केली जाते आणि घाईमध्ये अनेकदा अंदाज चुकतात आणि एकूणच लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. राजकारणातील कोणतीही गोष्ट सहजासहजी घडत नसते. त्यामागे अनेक कांगोरे असतात. देशातील सर्वात मोठ्या राज्याची विधानसभा निवडणूक पार पडली.
    निवडणुकीतील वातावरण व त्यानंतर आलेले निकाल  या क्षेत्रात अनेक वर्ष काम करणाऱ्या अभ्यासकांनाही चक्रावून सोडणारे आहेत. इथुन पुढे निवडणुकीचे निकाल येत्या काही वर्षात असेच असतील असे गृहीत धरून चालायला काही हरकत नाही.
                        ADVERTISEMENT 
    उत्तरप्रदेश निवडणुकी संदर्भातील विश्लेषण करताना अनेक मुद्यांचा विचार करावा लागेल. गेली दहा वर्ष प्रसार माध्यमातून एकतर्फी सुरू असलेली चर्चा व त्याला समांतर विरोध करणारी सोशल मीडियातील चर्चा या बाबीतून नेमका अंदाज येत नाही. फक्त उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विचार केल्यास वेगळे मुद्दे समोर येतात तर पंजाबचे निवडणुकीबद्दल विश्लेषण करताना ते मुद्दे वेगळ्या अर्थाने समोर येतात.  परंतु यात समान धागा आहे  तो म्हणजे गरिबीचा. ही निवडणूक भुकेच्या मुद्द्यावरच झाली.
    दोन्ही प्रदेशातील आर्थिक परिस्थिती या निवडणुकीचा मुख्य मुद्दा होता येथे धर्म, जाती या मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा लाभार्थी वर्गाचा होता. लाभार्थी वर्ग त्यांना मिळणाऱ्या रेशनच्या धान्याचा मुद्दा हा काय नवीन नव्हता. रेशनची योजना गेली पन्नास वर्ष सुरू आहे. तो मुद्दा आजच प्रभावी का ठरला व या मुद्द्यावर महिलांनी भाजपाला का जास्तीचे मतदान केले याचा विचार केला तर हा एक नियोजन करून त्यासाठी खूप वर्ष काम करून तयार केलेला मुद्दा आहे.
    लोकशाहीतील सर्व मूल्यांना पायदळी तुडवत जनतेच्या गरिबीचा खाल्ल्या मिठाला जागणे याचा मुद्दा याठिकाणी पुढे आला. कारण सर्वसामान्य माणसांची उत्तरप्रदेश मधील परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. सधन भागांमध्ये हा मुद्दा प्रभावी ठरला नाही, परंतु दारिद्र्य असणाऱ्या कमी उत्पन्न लोकांमध्ये हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरला. त्याने बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, धर्म व  जातीचा मुद्दा यापेक्षाही प्रभावी काम केले. हा गरीब वर्ग जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला का ? अशी शंका येते. २०१७  ला नोटबंदी अचानक लागू करण्यात आली आणि सर्वसामान्य माणसांच्या खिशातील  पैसा काढून घेतला. असंघटित अर्थव्यवस्था नष्ट  झाली.  त्याचबरोबर जीएसटीच्या माध्यमातून इंधन दरवाढीच्या माध्यमातून महागाई वाढत नेली.  दुसर्‍या बाजूला कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात रोजगार हिरावला गेला.  त्यामुळे फार मोठा सामाजिक वर्ग लाभार्थी म्हणजेच परावलंबी वर्ग तयार झाला. हजारो किलोमीटर पायी चालत गेलेले लोक तसेच ज्या लाखो लोकांनी आपल्या  कुटुंबातील लोक गमावले असताना    हा वर्ग मिठाला जागला. याचे कारण त्याला जगण्याचा दुसरा कोणताही आधार शिल्लक राहिला नाही किंवा तो राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली.
    संकटाच्या काळात आपल्याला भाजपा सरकारने किमान अन्न तरी खाऊ घातले अशी भावना महिला वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात तयार झाली. फुकट दिलेले सिलेंडर परत भरता आले नाही, तरी किमान खाण्यासाठी अन्न  मिळाले, हा मुद्दा तिथे प्रभावी ठरला. एक फार मोठा वर्ग कधीकाळी काँग्रेस व बहुजन समाज पार्टीचा कोअर वोटर होता. तो वर्ग भाजपासारख्या धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या आणि विशिष्ट जातीचे प्राबल्य असणाऱ्या पक्षाच्या बरोबर गेला. कारण तो इतका परावलंबी बनल्यामुळे हतबल झालेला  आहे. यांचा आपण अंदाज ही करू शकत नाही. त्याला आज खाण्यासाठी घरात असेल तर उद्याचे काय अशी याची चिंता आहे.  ही परिस्थिती जाणीवपूर्वक तयार करण्यात आली.
    आपण वर विश्लेषण केल्याप्रमाणे या वर्गाचा रोजगार उत्पन्नाचे स्रोत सर्व बंद करून त्याला सरकारकडून मिळणाऱ्या मदतीवर विसंबून रहावेच लागेल.  जर हा रेशनवरचे मिळणारे धान्य तसेच वर्षाला खात्यात जमा होणारे सहा हजार रुपये  व निवडणुकीच्या काळात या गरिबांना दिलेला किराणा माल हा फार मोठा आधार वाटावा, अशी परिस्थिती निर्माण केली गेली.  त्यामुळे हा असा वर्ग धर्म, जात या बरोबर आपल्याच कुटुंबातील व्यक्तींचे कोरोना काळामध्ये झालेले भयंकर मृत्यू, आपल्या तरुण मुलांचे भवितव्य या सर्व गोष्टीला बाजूला सारत भाजपाच्या पाठीमागे गेला. दररोजच्या जगण्याचा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे तो भूतकाळहि विसरला आणि भविष्याची चिंताही विसरला आज आपल्या जगण्याचा मेळ घालणे हा त्याच्या समोरचा मुद्दा होता.
    समाजवादी पार्टीने सर्व प्रकारचे आश्वासने दिली. आश्वासनांवर पोट भरत नाही. ज्या लोकांना प्रत्यक्ष मदत मिळाली ते विसरले नाहीत, परंतु भविष्यातील आश्वासनांपेक्षा सध्या मिळत असलेले धान्य महत्वाचे वाटले.  केंद्र सरकारने हे धान्य व पैसा बंद केला. तर तुमचे काय होईल अशी खूप मोठी प्रचार यंत्रणा अशा लाभार्थी वर्गापर्यंत पोहोचून त्याने खाल्लेल्या मीठाची जाणीव करून देत होते. पन्ना प्रमुख नावाची प्रचार यंत्रणा फक्त या लोकांमध्ये काम करत होती.
     विशेष म्हणजे मुस्लिम समाजाचे प्रमाण या मध्ये मोठ्या प्रामाणात आहे. त्यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन भाजपा आपला किती द्वेष करतो, हे भुकेसमोर विसरला व भाजपाबरोबर गेला. खरे तर तथाकथित हिंदुत्वासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. माझ्या हतबल हिंदू बांधवांच्या परिस्थितीचा फायदा घेत हिंदुत्ववादी पक्ष त्याला मदत करतो व त्याच परिस्थितीचा फायदा घेत त्याला मतदान मागतो. त्याला असह्य परिस्थितीत विवश करून त्याचा फायदा उठवणारा त्याचाच हिंदू भाऊ आहे, यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते. या लाभार्थी वर्गात मुस्लिमधर्मीय मोठया प्रमाणात आहेत. हा मुस्लिम कॉंग्रेसने सुद्धा असाच दरिद्री ठेऊन आपल्याबरोबर ठेवला होता हे विसरता कामा नये. मुस्लिम कडवट अथवा कट्टरवादी असतात या मताला येथे छेद गेला आहे. इथे धर्म, कट्टरवाद यापेक्षा भूक भारी ठरली आहे. ज्याने आम्हाला धान्य दिले त्याला आम्ही मतदान करू, ही बाब धर्मांध लोकांना सणसणीत चपराक आहे.
    धर्मापेक्षा महत्वाची पोटाची आग आहे, हे अधोरेखित करणारी ही निवडणूक आहे. अर्थात हे मीठ माझ्या घामातून मला दिले जात आहे, याचा विचार करण्याइतकी परिस्थिती आज सामान्य माणसाची राहिलेले नाही.  जाणीवपूर्वक दारिद्रय निर्माण करून त्यांच्यावर राज्य करा, हा गोळवलकर गुरुजींचा विचारधन या पुस्तकातील निर्देश अंमलात आणला गेला. लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी कमीच आहेत. त्याच बरोबरच जीवनमानाचा दर्जा अतिशय खलावलेला आहे. घर व शौचालय  ही सुद्धा मोठ्या  लोकसंखेची गरज होती. विशेष म्हणजे हा वर्ग शेतजमीन नसणारा वर्ग आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा यांचा काही सबंध नाही. शेतकरी आंदोलनामुळे आपली रेशनची भाकरी सुरक्षित राहणार आहे. शेतकरी आपल्यासाठीच आंदोलन करत आहे, याचा विचारसुद्धा या वर्गाने केलेला नाही. त्याने आपली आजच्या भाकरीची सोय पाहिली.
    उत्तरप्रदेशमधे गोरक्षा कायद्यामुळे मोकाट जनावरांचा मोठा त्रास झाला परंतु त्यांचा त्रास जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. ज्याला जमीन नाही. शेतीचे उत्पन्न नाही. अशा मोठ्या वर्गाला या प्रश्नाशी काही देणेघेणे नाही. लोक या प्रश्नावर बोलत होतो. शेतकरी आंदोलनाचा खूप मोठा प्रभाव होता.    तो फक्त मोठ्या व छोट्या अशा शेतकरी वर्गापर्यंत सिमित राहिला. त्या भागात त्याचा मतपेटीतून परिणाम दिसला. ज्या भागात शेतीपेक्षा दुसरे उत्पन्नाचे साधन असणारा वर्ग या शेतकऱ्यांनपेक्षा मोठा होता.  त्याठिकाणी भुकेचा प्रश्न ऐरणीवर आला.  उत्तरप्रदेश राज्य सरकारने मीठ सुद्धा रेशनच्या दुकानावर उपलब्ध करून दिले. मीठ आणि तेल या अत्यावश्यक बाबी गरिबांना दिल्या आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधानानी जनतेला मिठाला जगण्याचे आव्हान केले, ही बाब अतिशय धक्कादायक होती.
    आम्ही तुम्हाला जगवले तुम्ही आम्हाला मते द्या. असाच हा प्रकार होता. धान्य राजकीय पक्ष वा नेते देत नाहीत तर सरकार देते ही समज अद्याप जनमाणसांत नाही. याचा फायदा घेण्यात आला. राजकारण कोणत्या स्तरापर्यन्त घसरले यांची सर्वात खालची पातळी म्हणावी लागेल.
      हे सर्व पाहता सोशल मिडियाने बधीर झालेला मध्यमवर्ग व भुकेने व्याकुळ झालेला गरीब वर्ग ही नियोजनपुर्वक मतपेटी तयार करण्यात आली आहे. आता विविध मार्गाने अक्कल पाजळणाऱ्या बुद्धीवान वर्गाच्या मतांची त्यांना गरज नाही. त्यामुळे आता या वर्गाच्या उपद्रव मूल्याला घाबरण्याची गरज नाही. देशद्रोही, मुस्लिम व्हा, पाकिस्तानला जा, असे अंगावर धावत येणारा मोठा वर्ग  जाणीवपुर्वक निर्माण केला आहे. हिंदुराष्ट्र ही संकल्पना समजलेला एकही हिंदुराष्ट्र समर्थक त्याची मांडणी करु शकत नाही, याही पलीकडे मी हिंदू का आहे? हे पण तो सांगू शकत नाही, असा मोठा वर्ग सध्या कोणतीही चर्चा शांतपणे ऐकत नाही, तर तो अंगावर येतो. त्यामुळे चर्चेतून त्याला काही समजून सांगता येईल ही आशा आता सोडून द्यावी लागेल. या सामाजिक विभाजणाला धर्म हा आधार शोधण्याची गरज नाही. आता बौद्धिक दिवाळखोर व आर्थिक दिवाळखोर हा फार मोठा वर्ग आता पक्का मतदार झालेला आहे. त्यामुळे आता ई. व्ही. एम. बद्दल शंका घेतली तर त्या व्यक्तीचे बरेवाईट होऊ शकते. इतका आक्रमक वर्ग तयार झाला आहे.
    पंजाब विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला हटविण्यासाठी आम आदमी पार्टीला संधी मिळाली असे नाही, ती दिली गेली. हा प्रयोग ई. व्ही. एम. वरील आरोप होऊ नये म्हणून आहे. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर दिल्लीत असाच प्रयोग झाला होता. तो उत्तरप्रदेशनंतर पुन्हा झाला ई. व्ही. एम. हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.
    परंतु सध्याच्या दोनच सत्ताधारी व्यक्तिंनी जगाचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. त्यांनी भुकेतून सत्तेचा मार्ग शोधला असेल, परंतू हीच भूक रक्तरंजित क्रांतीला कारणीभूत ठरलेली आहे.
(लेखक न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर येथे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!