नगर जिल्हा गाजविणारा आयपीएस अधिकारी खंडणीच्या गुन्ह्यात

0
298
जामखेड न्युज – – – 
लोभापोटी कोणाचे नशीब कसे बदलेल, हे सांगता येत नाही. नगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून चांगले काम केल्याची प्रतिमा असलेले IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी सध्या खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मुंबई पोलिस आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होणे आणि नोकरी जाणे अशा कठोर बाबींना त्यांना सामोरे जावे लागणार आहे.
                        ADVERTISEMENT
सौरभ हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्यपाल के. शंकरनारायण यांचे सहायक (ADC) म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांची 2015 मध्ये नगरचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेथे त्यांनी चांगले काम केल्याची प्रतिमा होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरही त्यांनी प्रभाव टाकला होता. अण्णा यांनी त्या काळात केलेल्या आंदोलनात त्रिपाठी यांनी चोख बंदोबस्त ठेवत त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर त्यांची बदली मुंबईत झाली. मुंबईत परिमंडळ चारचे उपायुक्त म्हणून आणि नंतर सुरक्षा विभागाचे उपायुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले.
अंगडिया व्यावसायिक खंडणी प्रकरण : IPS सौरभ त्रिपाठींवर गुन्हा दाखल
त्यांची नियुक्ती परिमंडळ दोनमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. तिथे त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली पण त्यांनी अद्याप चार्ज घेतला नाही. दरम्यान त्रिपाठी यांना पाहिजे आरोपी म्हणून घोषित करण्यात आलंय आणि गृहविभागाला निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
त्रिपाठी यांच्या तोंडी सूचनांनुसार या अंगडियांकडून महिन्याला दहा लाख रुपयांचा हप्ता गोळा करत असल्याची माहिती यातील आरोपी झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी दिल्याने त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले. मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबत कठोर भूमिका घेतल्याने त्रिपाठींविरुद्ध कारवाई झाल्याचे बोलण्यात येत आहे. त्रिपाठी हे बेपत्ता झाले असून पोलिस त्यांच्या शोधासाठी त्यांच्या घरीही गेले होते. ते आजारी असल्याचे त्यांच्या पत्नीेने या वेळी सांगितले. त्रिपाठी यांना का आरोपी केले? त्यांच्याविरोधात कोणते पुरावे याची माहिती पोलिसांनी गृह विभागाकडे आज दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्रिपाठी यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले. त्रिपाठी यांच्याशिवाय अन्य कोणी अधिकारी आणि कर्मचारी यांचाही या वसुलीत हात होता का, याचीही चौकशी आता सुरू झाली आहे.
काय आहे अंगडिया वसुली प्रकरण?
प्राप्तीकर विभागाच्या कारवाईची भीती दाखवून अंगडिया व्यावसाय करणाऱ्यांकडून पोलिसांनी खंडणी वसुली केली होती. या प्रकरणी पोलिस निरीक्षक नितीन कदम, समाधान जमदाडे आणि पोलिस उपनिरीक्षक ओम वानगाते यांच्यावर लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याच वेळी अंगडिया असोसिएशनचे डिसेंबर 2021 मधील एक पत्रदेखील व्हायरल झाले होते. त्यात त्रिपाठी यांनी महिना दहा लाख रुपये हप्ता देण्याची धमकी दिली होती. ती न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. याबाबत दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त दिलीप सावंत यांनी स्वतः फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या `सीआययू` (क्राईम इंटेलिजन्स युनिट) पथकाकडे देण्यात आला आहे. वादग्रस्त पोलिस अधिकारी याच्या कारनाम्यामुळे सीआययू युनिट चर्चेत आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here