जामखेड न्युज – – –
जमिनीवरील बांधकाम नमुना नंबर ८ काढून देण्यासाठी ३ हजारांची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (सोमवार) शेकटा (ता. पैठण) येथे केली. अशोक रामराव वाघ असे अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नांव आहे.
ADVERTISEMENT

याबाबत अधिक माहिती अशी, पैठण तालुक्यातील शेकटा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अशोक वाघ यांनी शेकटा येथील एका तक्रारदार व त्याच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीवरील बांधकाम नमुना नंबर ८ काढून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती ३ हजार रुपये देण्याचे ठरले होते.
दरम्यान, तक्रारदाराने संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा सौदागर यांनी लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून ग्रामसेवक अशोक वाघ यांना ३ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे पैठण तालुक्यातील महसूल विभागात खळबळ उडाली आहे.