JEE/NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स सीड प्रोग्रामअंतर्गत मिळणाऱ्या मोफत मार्गदर्शनाचे आमदार रोहित पवारांच्या हस्ते उद्घाटन – विद्यार्थी व पालकांना तब्बल 4.5 कोटींची अप्रत्यक्षपणे होणार मदत

0
291
जामखेड न्युज – – – 
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून व टाटा मोटर्स लिमिटेड यांच्या सहकार्यातून आमदार पवारांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून जेईई व नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांसाठी सीड प्रोग्राम अंतर्गत मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते कर्जत व जामखेड येथे स्वतंत्र उद्घाटन करण्यात आले. जामखेड मधील ल.ना होशिंग महाविद्यालयात हा सोहळा पार पडला तर कर्जत येथील श्रीराम मंगल कार्यालयात आमदार पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. नीट परीक्षेचा फायदा डॉक्टर बनण्यासाठी चांगलं मेडिकल कॉलेज मिळावं यासाठी होत असतो. त्याचबरोबर जेईई परीक्षेचा फायदा हा इंजीनियरिंगसाठी चांगलं कॉलेज मिळावं यासाठी होत असतो.
काही दिवसांपूर्वीच टाटा मोटर्सच्या सीड प्रोग्राम अंतर्गत मोफत प्रशिक्षणसाठी घेण्यात आलेली प्रवेश परीक्षा 850 हून अधिक विद्यार्थ्यांनी दिली. त्यापैकी कर्जत तालुक्यातील 179 विद्यार्थी तर जामखेड तालुक्यातील 49 विद्यार्थी असे एकूण 228 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांची निवड करण्यात आली. पुढील वर्षभर आता या विद्यार्थ्यांना जेईई व नीट परीक्षांचे मार्गदर्शन टाटा मोटर्स लिमिटेड व कर्जत जामखेड विकास संस्थेच्या माध्यमातून मोफत देण्यात येणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांना सखोल व सुयोग्य मार्गदर्शन मिळावे याची ते सर्वतोपरी काळजी घेणार आहेत. विशेष बाब म्हणजे या मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांची दर आठवड्याला परीक्षा देखील घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात मुलांना आणि पालकांना बोलण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी असे म्हटले की, आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे आम्ही उराशी बाळगलेले स्वप्न दाबून ठेवणार होतो. पण टाटा मोटर्स आणि आमदार रोहित दादा यांनी दिलेल्या संधीमुळे आम्ही आमचं डॉक्टर आणि इंजिनिअर बनण्याचं स्वप्न आता पूर्ण करू शकतो. या प्रशिक्षणामुळे प्रत्येकी 2 लाख म्हणजे एकूण 4.5 कोटी रुपयांची मदत या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना अप्रत्यक्षपणे होणार आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे विद्यार्थ्यासाठी आयोजन केल्यामुळे जेईई व नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर खासगी शिकवणुकीतून येणारा लाखो रुपयांचा आर्थिक ताण हा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनाही पुढील उज्ज्वल भविष्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील विद्यार्थ्यांसह पालकांनीही अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन केल्याबद्दल आमदार रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.
प्रतिक्रिया –
मतदारसंघातील युवांना व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो टाटा मोटर्सने माझ्या मतदारसंघातील 228 विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत प्रशिक्षणाची संधी दिली त्याबद्दल मी सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो. अशी पिढी जेव्हा घडेल तेव्हा या युवकांचासुद्धा विकासाला अप्रत्यक्षपणे हातभार लागेल.  – आमदार रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here