अवैध गर्भपातप्रकरणी आरोपी डॉ. सुदाम मुंडेला ४ वर्षांची सक्तमजुरी

0
248
जामखेड न्युज – – – – 
राज्यभर गाजलेल्या बीडच्या अवैध गर्भपात प्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय. अंबाजोगाई न्यायालयाने आरोपी डॉ. सुदाम मुंडेला ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. याआधी आरोपी मुंडेला औरंगाबाद उच्च न्यायालयाने वैद्यकीय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला होता. या आदेशाचे उल्लंघन करुन डॉ. मुंडेने वैद्यकीय व्यवसाय थाटला. त्यामुळे त्याच्यावर तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी कारवाई केली. यावेळी आरोपी मुंडेने शल्यचिकित्सक थोरात यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी अंबाजोगाई न्यायालयाने बुधवारी (२३ फेब्रुवारी) हा निकाल दिला.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी (२३ फेब्रुवारी) परळी येथील डॉ. सुदाम मुंडेला भारतीय दंड विधान कलम ३५३ प्रमाणे चार वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. कलम ३३ (२) मेडीकल व्यवसाय कायद्यान्वये ३ वर्षे शिक्षा आणि कलम १५ (२) इंडियन मेडीकल कौन्सिल कायद्यान्वये एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
जिल्हा व सत्र न्यायालयाने महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यामुळे डॉ. सुदाम मुंडेला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन देतेवेळी आरोपी मुंडेला ५ वर्षांसाठी वैद्यकिय व्यवसाय न करण्याच्या अटीवर जामीन दिला. यानंतर देखील आरोपी मुंडेने उच्च न्यायालयाच्या अटीचे उल्लंघन करुन वैद्यकीय व्यवसाय चालू ठेवला.
याप्रकरणी बीडच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बोगस डॉक्टर शोध कमिटीने परळीतील रामनगर येथे ५ सप्टेंबर २०२० रोजी आरोपी मुंडेच्या दवाखान्यावर छापा टाकला. त्या ठिकाणी चार रुग्ण उपचार घेताना आढळले. वैद्यकीय व्यवसायाचे साहित्य व उपकरणे मिळून आली. या छाप्यात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात व उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. बिपीन पाटील, डॉ. कुर्गे, डॉ. मेढे हे होते.
छाप्या दरम्यान डॉ. सुदाम मुंडेने जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक थोरात यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी मुंडे विरोधात परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहायक पोलीस निरीक्षक एकशिंगे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदाराची साक्ष व सरकारी वकील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपी सुदाम मुंडेला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here