जामखेड न्युज – – – –
संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 21 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचा भव्य दिव्य अनावरण सोहळा आज (18 फेब्रुवारी) रात्री 10 वाजता पार पडणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुतळ्याचे ऑनलाईन अनावरण केले जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा देशातील सर्वात उंच अश्वारुढ पुतळा आहे. चौथऱ्यासह पुतळ्याची उंची 52 फूट एवढी आहे. अनावरणाच्या वेळेवरून आठवड्यापासून राजकीय वादंग उभे राहिले असले तरी रात्री 12 वाजेपर्यंत अनावरणाचा सोहळा चालणार आहे.
दरम्यान, या याप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऑनलाइन सहभागी होतील. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह डॉ. भागवत कराड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रत्यक्ष उपस्थिती राहील. त्याचबरोबर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील कार्यक्रमाला येणार असल्याची माहिती मिळतेय.
पुतळ्याचं वैशिष्ट्य आणि संक्षिप्त माहिती
शिवाजी महाराजांच्या या अश्वरुढ पुतळ्याची उंची ही 21 फूट आहे. पुतळ्याचं वजन हे 7 मेट्रिक टन इतक आहे. पुतळा बनवण्यासाठी ब्रॉंझ धातूचा वापर करण्यात आला आहे. पुतळ्याची चौथऱ्याची उंची 31 फूट इतकी आहे. तर चौथऱ्यासह पुतळ्याची उंची 52 फूट इतकी आहे.
चौथऱ्याचं बांधकाम हे आरसीसीमध्ये असून चौथऱ्या भोवती स्टोन क्लायडिंग करण्यात आलं आहे. चौथऱ्या जवळच्या 24 कमानी आहेत. या 24 कमानीत 24 मावळ्यांच्या प्रतिकृती बसवण्यात आल्या आहेत. चौथऱ्या भोवती कारंजे तयार केलेले आहेत. तसंच हत्तीच्या सोंडेतून कारंजा सदृष्य पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.