जामखेड न्युज – – – –
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांच्या चर्चेचं कारण आहे त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे. करूना मुंडे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘शिवशक्ती सेना’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. तेव्हापासून त्या विविध ठिकाणी राजकीय दौरे करत आहेत.
करुणा मुंडे या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी, ‘शिवशक्ती सेना’तर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यात येणार आहेत. शिवाय कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक देखील लढवली जाईल. इच्छुकांशी चर्चा सुरू आहे. यासाठी कोणी सक्षम उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. याशिवाय,२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा आमच्या पक्षाच्या वतीने लढवण्यात येणार असल्याचंही त्यांनी बोलतांना म्हटलं आहे.
दरम्यान, करुणा मुंडे यांच्या पक्षाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून पक्षातर्फे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्यात येणार आहे. पक्षाला सक्षम उमेदवार मिळाला नाही तर आपण स्वत: मैदानात उतरणार अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे.
रुपाली चाकणकरांवर साधला निशाणा
राजकीय क्षेत्रात घराणेशाहीचं प्रमाण वाढलं आहे.विशेष म्हणजे सर्वच पक्ष आज घराणेशाही जोपासत असल्याचं चित्र आहे. मात्र, या घराणेशाहीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. असं मत करुणा मुंडे यांनी पत्रककारांशी बोलताना मांडलं. ‘राज्यात महिला अत्याचारात वाढ झाली आहे. पण महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या मूग गिळून गप्प आहेत.’ या शब्दांत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावरही निशाणा साधला.
दरम्यान, करुणा मुंडे यांनी अनेक गंभीर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत सापडले होते. त्यानंतर आता करुणा मुंडे या थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरत असल्याने पुन्हा एकदा पती धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.









