जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ निवेदक आनंद देशमुख यांना “जीवन गौरव” पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यामुळे जामखेड करांच्या वतीने फोनद्वारे, सोशल मिडीयावर अभिनंदनाचा वर्षांव करण्यात येत आहे.
जीवन गौरव पुरस्काराबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उध्दवराव देशमुख, सचिव शशिकांत देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेशजी मोरे सह सर्व संचालक तसेच ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, श्री साकेश्वर विद्यालय साकत येथिल मुख्याध्यापक दत्ता काळे, शिक्षक सुदाम वराट, जाहेद बागवान, विजय हराळे सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, न्यू इंग्लिश स्कूल राजुरी, भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य व सर्व कर्मचारी यांनी आनंदजी देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.
आनंद देशमुख यांच्या आतापर्यंतच्या कार्याबाबत थोडक्यात माहिती
पुण्याच्या सांस्कृतिक आणि सांगीतिक क्षेत्रात आनंद देशमुख यांचे नांव अतिशय अभिमानाने आणि कौतुकाने घेतले जाते. निवेदन आणि सूत्रसंचालन या क्षेत्रात सुमारे अर्धशतक ते अव्याहतपणे कार्यरत आहेत आणि हजारो श्रोत्यांची मने त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने आणि विनम्र स्वभावाने जिंकली आहेत.
विविध क्षेत्रातील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून आज ते सुपरिचित आहेत. अहमदनगर जिल्हयातील त्याकाळच्या छोटयाशा जामखेडमध्ये जन्म झालेल्या श्री. देशमुखांनी पुण्यात येऊन तीव्र स्पर्धेला तोंड देत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. फर्ग्युसन कॉलेज मधून मराठी विषयातील पदवी संपादन करत असताना, कॉलेज मधील चार वर्षांचा काळ त्यांनी अनेक वैशिष्ठयपूर्ण उपक्रमांनी गाजवला. होस्टेल डे निमित्त सादर होणारी त्यांची बातमीपत्रं विद्यार्थ्यांपासून प्राध्यापक आणि प्राचार्या पर्यंत कौतुकाचा, औत्युक्याचा विषय ठरली. साहित्याला वाहून घेतलेल्या साहित्य सहकार चे सचीव म्हणून त्यांचे काम गौरवले गेले. डॉ. वि. रा. करंदीकर, श्री. स. शि. भावे, डॉ. वि. मा. बाचल, डॉ. धडफळे, श्री. देवदत्त दाभोळकर, डॉ. जी. एन. जोशी यांच्या संस्कामुळे देशमुखांचं व्यक्तिमत्व साकारत गेलं.
पुढे पुणे विद्यापीठात मराठी मध्ये एम. ए. करत असताना यांत डॉ. रा. शं. वाळींबे, डॉ. भालचंद्र फडके यांच्याही मार्गदर्शनाची आणि प्रेमाची भर पडली. शिक्षण चालू असतानाच त्यांचा संपर्क पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटीक
असोसिएशन (पी.डी.ए.) या सुप्रसिध्द नाटयसंस्थेशी आला.
आदरणीय श्री. भालबा केळकर यांचा सहवास, प्रेम आणि तालीम मिळणं ही देशमुखांच्या आयुष्यातील भाग्याची गोष्ट होय. श्री. भालबा यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक नाटकांमधून विविध भूमिका त्यांनी साकारल्या. पुरूषोत्तम करंडक स्पर्धेतही श्री. सदाशिव अमरापूरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बंधमुक्त’ एकांकीकेतील ‘चोर’ या भूमिकेसाठी अभिनयाचं पारितोषिकही मिळालं. ‘पुरूषोत्तम’ मुळेच श्री. आनंद देशमुख यांना एक नवी संधी चालून आली ती म्हणजे रेडिओच्या नोकरीची. ही नोकरी करीत असताना ते पत्रकारीतेतील पदवी प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झाले. त्याचप्रमाणे पुण्यातील फिल्म इंस्टिटयुट मध्ये त्यांनी दूरदर्शन कार्यक्रम निर्मीतीचा डिप्लोमाही केला. स्वतःची ‘चिरायू व्हिडीओ’ ही संस्था स्थापन करून अनेक लघुचित्रफितींची निर्मिती केली. आकाशवाणीमध्ये सुमारे २५ वर्षांच्या कालखंडात असंख्य कार्यक्रमांची निर्मिती
श्री. देशमुख यांनी केली. युववाणी, उद्योगसाधना, नभोनाटय, परिचय, इ. विभाग त्यांनी समर्थपणे सांभाळले. एक हजारापेक्षा अधिक विविध क्षेत्रातील व्यक्तिंच्या मुलाखती वैशिष्टयपूर्ण ठरल्या. कौटुंबिक श्रुतिका आणि नभोनाटय यातील त्यांच्या भूमिका अद्यापही श्रोत्यांच्या स्मरणात आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरील दर मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष सादर होणाऱ्या त्यांच्या सुप्रभात मुळे श्री. देशमुखांचे नाव घराघरात पोहोचले. त्यांनी सादर केलेल्या असंख्य सुप्रभातच्या आठवणी आजही श्रोते विसरलेले नाहीत.
जामखेडला प्राथमिक शिक्षण घेत असतांनाच श्री. देशमुख यांचा मधुर आवाज आणि स्पष्ट वाणी यामुळे विविध कार्यक्रमांचे निवेदन, प्रमुख पाहुण्यांची ओळख ही कामे
त्यांच्यावर सोपवली जात. एक अर्थाने निवेदन क्षेत्रातील आजच्या यशाची बीजं ही तिथेच रूजली. निवेदन / सूत्रसंचालन हा आनंद देशमुख यांचा स्थायीभावचं आहे.
अतिशय सोपी भाषा, श्रोत्यांना आपले वाटतील असे शब्द, निवेदनातील नम्रता आणि प्रामाणिकपणा, श्रोत्यांच्या मनातीलच भावना निवेदनात व्यक्त होणं या वैशिष्टयांमुळे
श्री. आनंद देशमुख यांचे निवेदन जाणकार श्रोत्यांना आवडू लागले आणि अल्पावधीतच एक रसिक प्रिय निवेदक म्हणून त्यांचे नाव या क्षेत्रात कोरले गेले. कमीत कमी परंतू
अत्यंत परिणामकारक शब्दांत संपूर्ण आशय श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे ही देशमुखांची खासियत ! पुण्यातील आणि पुण्याबाहेरिल अनेक नामवंत संस्था आणि संगीत महोत्सव
यांच्यासाठी श्री. देशमुख सातत्यानं निवेदन करत आहेत ही एक प्रकारे त्यांच्या कार्याची पावतीचं म्हणावी लागेल.
पुण्यात साजरा होणारा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव म्हणजे संगीत क्षेत्रातील मानबिंदू ! या उत्सवाचे सलग २६ वर्षे श्री. आनंद देशमुख निवेदन करत आहेत. हे त्यांच्या आयुष्यातील परमोच्य भाग्यच आहे. हा या क्षेत्रातील एक उच्चांक आहे. रेडिओ कार्यक्रमांच्या निर्मितीसाठी लेखन सादरीकरण या विषयावरची त्यांची
व्याख्यानं हा विविध नामांकित शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी एक अमूल्य ठेवा आहे. वेळोवेळी होणाऱ्या सूत्रसंचालनाच्या कार्यशाळेतील त्यांचा सहभाग उल्लेखनीय
असतो.
आनंद देशमुख यांचे स्वनिर्मित कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाले आहेत. ते असे आहेत.
१) ‘मैं हर एक पलका शायर’, गीतकार साहिर लुधीयानवी यांच्या चित्रपट गीतांवर
आधारीत दृकश्राव्य कार्यक्रम.
२) ‘जीना इसिका नाम है’ – कवी शैलेंद्र यांच्या चित्रपट गीतांवर आधारीत दृकश्राव्य कार्यक्रम.
३) ‘जुळया सगळया त्या आठवणी’. श्री. सुधीर फडके यांची १९८६ साली ध्वनिमुद्रीत केलेली दुर्मिळ ध्वनी चित्रफीत.
४) ‘मखमली यादें सुप्रसिध्द गायक तलत मेहमुद यांच्यावरील दृकश्राव्य कार्यक्रम.
आतापर्यंत मिळालेले सन्मान
१) पुणे महानगरपालिकेच्या वतीने निवेदनाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरी बदद्ल सन्मान २००७
२) मंगल थिएटर्स तर्फे – ‘आई’ पुरस्कार
३) श्रीमंत अबासाहेब मुजुमदार स्मृती रसिकराज’ पुरस्कार :
२०१४ रोटरीक्लब गांधीभवन यांच्यावतीने
४) रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार २०१४
५) बलराज साहनी- साहिर लुधियानवी फौंण्डेशन तर्फे
‘साहिर लुधियानवी’ पुरस्कार २०१६
६) रंगत संगत प्रतिष्ठान आणि श्यामची आई फौण्डेशन तर्फे
२०१६ जिंदादिल’ पुरस्कार
आणी आता २०२२ मध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबाबत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









