मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार रोहित पवारांचा दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा!!!

0
282
जामखेड न्युज – – – – 
कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा दिल्ली गाठली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड या मंत्र्यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रश्नांबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा केला.आमदार रोहित पवार हे कायमच मतदारसंघाच्या विकासासाठी झटत असतात. त्याचीच परिणती मतदारसंघात दिसत असून अनेक विकास काम सुरू असलेली पाहायला मिळत आहेत. यापूर्वीही त्यांनी दिल्लीत जाऊन अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या होत्या.
कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी राज्य सरकारची तीन उपजिल्हा रुग्णालये आहेत. कर्जत तालुक्यातील मिरजगांवमध्ये महामार्गालगत तिसऱ्या उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता दिली आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने अपघात होण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे अपघात झाल्यास अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांची भेट घेऊन ‘नॅशनल हेल्थ मिशन’ अंतर्गत मिरजगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाला 38.35 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. हा निधी मिळाल्यास मतदारसंघातील नागरिकांनाही अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरवता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनीही रोहित पवार यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघात परंपरागत व्यवसाय करणारे अनेक हस्तकारागीर व बारा बलुतेदार आहेत. या कारागिरांसाठी केंद्र सरकारच्या SFURTI योजनेअंतर्गत मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरु करावे, या मागणीसाठी रोहित पवार यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग खात्याचे मंत्री नारायण राणे यांचीही भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरु झाल्यास हस्त कारागिरांच्या उत्पादनाला चालना मिळेलच शिवाय त्यांना हक्काची बाजारपेठही उपलब्ध करुन देण्याचा रोहित पवार यांचा प्रयत्न आहे. संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिले आहे.
मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा सुरू करून सर्वसमावेशक बँकिंग सेवा वाढविण्यासंदर्भात त्यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यापूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर या प्रक्रीयेला मोठ्या प्रमाणात गती मिळाली. आता ‘राज्य पातळीवरील बँकींग कमिटी’अंतर्गत (एसएलबीसी) बँकांच्या शाखांना तातडीने मान्यता द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी पुन्हा एकदा डॉ. कराड यांना भेटून केली. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले आहे. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या या पाठपुराव्याचा फायदा केवळ कर्जत-जामखेड मतदारसंघालाच नाही तर संपूर्ण राज्याला होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here