जामखेड न्युज – – – –
आंध्र प्रदेशच्या जंगलातून मोठ्या प्रमाणात रक्तचंदनाची ताकारी कशी केली जाते यावर प्रकाश टाकणारा चित्रपट ‘पुष्पा’ या चित्रचित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली. पुष्पाची चालण्याची स्टाईल, त्याचं बोलणं, त्याचे डायलॉग्जने तरुणाईला वेड लावलंय. मात्र, चित्रपटातील पुष्पा पोलिसांना चकवा देत असला तरी, सांगली पोलिसांना खऱ्या आयुष्यातील एका पुष्पाला अटक करण्यात यश मिळालंय.
आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात दाखल झालेलं सुमारे दोन कोटी 45 लाखांहून अधिक किमतीचं 1 टन रक्तचंदन मिरजेत पोलीस आणि वन विभागानं धाड टाकून पकडलंय. यासिन इनायतउल्ला खान असं चंदनाची तस्करी करत असलेल्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांना रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, उपाधिक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकानं वन विभागाच्या साहाय्यानं चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यानुसार फडणीस यांनी मिरज-कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला.
यावेळी पोलिसांना द्राक्ष वाहून नेतानाचा KA 13 6900 क्रमांकाचा ट्रक दिसून आला. पोलिसांनी या ट्रकला अडवलं असता, चालकाने उडवाउडवीची उत्तर दिली. चालकाची हालचाल संशयास्पद असल्याने पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. त्यावेळी, ट्रकमध्ये वरती फळांचे क्रेट आणि त्याखाली रक्तचंदनाचे 32 ओंडके आढळून आले. हे रक्तचंदनच आहे, याची खात्री पोलिसांना पटली. त्यानंतर पोलिसांनी वनविभागासह तातडीनं कारवाई करत ते सर्व ओंडके ताब्यात घेतले. हे रक्त चंदन नेमकं कुठून आलंय? याची माहिती अद्यापही समोर आली नसून पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत.





