जामखेड न्युज – – – –
राज्याच्या गृह विभागामार्फत सात हजार 200 पदांची भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील उमेदवारांना अधिक संधी मिळावी म्हणून अगोदर शारीरिक चाचणी, त्यानंतर लेखी परीक्षा द्यावी लागेल, असा कॅबिनेटने निर्णय घेतला. मात्र, तो निर्णय अद्याप कागदावर आला नसल्याने नवीन पोलिस भरती जुन्याच पध्दतीने होणार असून उमेदवारांना सुरवातीला लेखी परीक्षाच उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. (Maharashtra Police Bharti News Updates)
कोरोना काळात अनेक पोलिस कर्मचारी शहीद झाले. दोन वर्षांत बरेच पोलिस कर्मचारी सेवानिवृत्त झाले. बहुतेक जिल्ह्यांमधील महिला पोलिसांना आठ तासांचीच ड्यूटी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम गुन्ह्यांच्या तपासावर होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे सण, उत्सव, जयंती, आंदोलनावेळी बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी कमी पडू लागले आहेत. त्यामुळे मार्चनंतर ही नवीन भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तत्पूर्वी, 2019 मधील भरतीत पात्र ठरलेल्या पाच हजार 200 उमेदवारांपैकी आतापर्यंत केवळ एक हजार जणांचीच वैद्यकीय चाचणी आणि चारित्र्य पडताळणी झाली. त्यातील सहाशे जणांना प्रशिक्षणासाठी पाठविले आहे. दरम्यान, राज्यातील नऊ पोलिस प्रशिक्षण केंद्रांपैकी चार केंद्रे रिकामी आहेत. पाच प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांचे ट्रेनिंग जूनपर्यंत संपणार आहे. त्यामुळे तोवर नवीन पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास काहीच अडचण नाही, असे गृह विभागाचे मत आहे. त्याचे नियोजन युध्दपातळीवर सुरु असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रामीण विद्यार्थ्यांना पोलिस भरतीमध्ये अधिक संधी मिळावी म्हणून सुरवातीला मैदानी आणि त्यानंतर लेखी परीक्षा देता येईल, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने 2019 मध्ये घेतला. मात्र, तो निर्णय अद्याप कागदावरच आहे. सुरवातीला लेखी परीक्षा घेतल्याने ग्रामीणमधील बहुतेक उमेदवार मागे पडतात म्हणून तो निर्णय घेतला होता. परंतु, भरती नियमात तसा बदल न केल्याने तुर्तास 2019 पूर्वीच्या जुन्याच पध्दतीने भरती प्रक्रिया राबविली जात आहे. आता गडचिरोली जिल्ह्यातील चारशे पदांची भरती प्रक्रियेत उमेदवारांना सुरवातीला लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. त्यास शासनाने परवानगी दिल्याने ग्रामीण उमेदवारांची चिंता वाढली आहे. पोलिस भरतीसाठी उमेदवारांना पहिल्यांदा लेखी परीक्षा द्यावी लागेल. 2019 मधील पोलिस भरती झालेल्यांचे चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय चाचणी सुरु आहे. वित्त विभागाची मान्यता असल्याने नवीन पदभरतीची प्रक्रिया काही दिवसांत सुरु होईल. – संजय कुमार, अप्पर पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके