जामखेड न्युज – – – –
श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवज्योत प्रकल्प सुरू केला असून या प्रकल्पातील वृद्ध व मुलांसमवेत जामखेड येथील सौ. आशा व अर्जुन भिमराव पवार सर यांनी आपल्या लग्नाचा 27 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना व वृद्धांना अल्पोपहार व मायेची ऊब म्हणून 15 ब्लॅंकेटची मदत करण्यात आली. संस्थेच्या वतीने पवार दाम्पत्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करुन शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व माहितीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक संतोष गर्जे यांनी श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस प्रकल्पात साजरा करून वृद्ध व मुलांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण केल्याबद्दल आभार मानले.
गोकुळ गायकवाड यांनी बोलताना सांगितले की श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेल्या नवज्योत प्रकल्पास गुरूमाऊली शिक्षक मंडळाच्या वतीने शुभेच्छा दिल्या व येथील वृद्धांना व मुलांना थंडी पासून सुरक्षा व्हावी याकरिता ब्लॅंकेटची मदत पवार सरांनी केली त्याबद्दल त्यांचे कौतुक केले व आम्ही सर्व शिक्षक मिळुन पुढील काळात आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
केंद्र प्रमुख किसन वराट यांनी बोलताना सांगितले की, जामखेड तालुक्यात प्रथमच नवज्योत प्रकल्पाच्या माध्यमातून वृद्धाश्रम व अनाथाश्रम सुरू झाले असून याठिकाणी असणारे वयोवृद्ध व मुलांना पाहून खरोखर समाजात अशा समाजसेवेची गरज असून खरोखर निराधारांना मदत करणे आवश्यक असल्याचे या प्रकल्पाकडे पाहिल्यावर समजले व येथील वृद्ध व मुलांच्या पालनपोषणास माझ्या वराट कुटुंबाकडून 3000 रूपयांची रोख स्वरूपात रक्कम संस्थेचे संचालक बापूसाहेब गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केली.
अर्जुन पवार सर यांनी बोलताना सांगितले की, संस्थेच्या माध्यमातून नव्याने सुरू झालेल्या अनाथाश्रम व वृद्धाश्रमासाठी शुभेच्छा दिल्या व आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या हातुन समाजसेवा घडावी यासाठी या प्रकल्पास ब्लॅंकेटची मदत केली असून पुढील काळात आमच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या बांधकामास लागणारी साधनसामग्री त्याच बरोबर शैक्षणिक साहित्याची आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. व शहरातील इतर कार्यकर्त्यांनी देखील वाढदिवसाला इतरत्र खर्च टाळून अनाथ, निराधार व वृद्धांना मदत करत आश्रमामध्ये वाढदिवस साजरे करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रकल्पातील मुले, वृद्ध व कर्मचारी उपस्थित होते.









