जामखेड न्युज – – –
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडेंना आता नव्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे युनिटने समीर वानखेडे यांना नोटीस बजावली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे युनिटने १९९७ मध्ये परवान्यासाठी केलेल्या अर्जात चुकीची माहिती दिल्याबद्दल समीर वानखेडे यांच्या नवी मुंबई बारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून ही माहिती समोर आली आहे.
याआधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधताना ते एका बारचे मालक असल्याचा दावा केला होता. वानखेडे हे नवी मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असून त्याचा परवाना वानखेडेंच्या नावे आहे, असं मलिक यांनी सूचित केलं होते.
मात्र वानखेडे यांनी आपण भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे असल्याचं स्पष्ट केले होते. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आलेहोते. “यात बेकायदेशीर असं काहीच नाही. मी सेवेमध्ये रुजू झालोय तेव्हापासून म्हणजेच २००६ सालापासून या बार आणि रेस्तराँरंटचा उल्लेख माझ्या वर्षीक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख मी संपत्तीच्या हिशोबात मांडलाय. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख मी प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केलाय,” असं वानखेडे यांनी म्हटले होते.
समीर वानखेडे यांच्या मालकीचा हा बार आणि रेस्तराँ नवी मुंबईमधील वाशी येथे आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे आहेत. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच हा परवाना रिन्यू करण्यात आला असून सध्या तो ३१ मार्च २०२२ पर्यंत पात्र आहे. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात आलीय.