Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या लालपरी बंदच– आतापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त कर्मचारी निलंबित तर दोन हजारांहून अधिक...

लालपरी बंदच– आतापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त कर्मचारी निलंबित तर दोन हजारांहून अधिक कर्मचार्‍यांची सेवा समाप्ती

0
290
जामखेड न्युज – – – 
संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन, सेवा समाप्ती किंवा बदलीची कारवाई एसटी महामंडळाने सुरू केली असून बुधवारपर्यंत तब्बल १० हजार ३० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. रोजंदारीवरील दोन हजार २७ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.
निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या मोठी
संपावर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली असून बुधवारी १२० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आत्तापर्यंत निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या १० हजार ३० झाली आहे. गेला सव्वा महिना एसटीचे कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. हा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतन वाढ देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार जे कर्मचारी संपकाळात कामावर हजर होते त्यांना ७ डिसेंबरला वेतन अदा करण्यात आले.
संप मागे घेतल्यानंतरच चर्चा
संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब आणि महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणीचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांच्यात बुधवारी संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीत गुजर यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात अजून वाढ करण्याची मागणी केली. मात्र परिवहन मंत्र्यांनी संप मागे घेतल्यानंतरच मागणीबाबत चर्चा करण्यात येईल, असे सांगितल्याने संपावर तोडगा निघाला नसल्याची माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान एसटीचा संप चालू असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!