“पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, घड्याळ ५० लाखाचे आणि..”, नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंवर हल्लाबोल

0
202
जामखेड न्युज – – – 
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी विभाग (एनसीबी) काम करीत असून फडणवीस यांचे निकटवर्तीय कार्यालयात वावरत आहेत, असा आरोप करीत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांचे माफियाबरोबरचा फोटो ट्विटरवर टाकला होता. त्यावर मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असून त्याबाबतचे पुरावे दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणि प्रसिद्धीमाध्यमांना देणार असल्याचे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर आता मंगळवारी पुन्हा नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांना उत्तर दिले आहे. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
                           ADVERTISEMENT 
“ड्रग्ज प्रकरणात वसुली मालदीव येथे झाली आहे. आम्ही दुबई आणि मालदीव दोघांचे फोटो टाकले आहे. समीर वानखेडे मालदिवला आणि त्यांची बहिण दुबईमध्ये होत्या. इतक्या लोकांना मालदीवला जाण्यासाठी २० ते ३० लाखांचा खर्च येतो. एनसीबीच्या दक्षता विभागाने याचा खर्च कोणत्या खात्यातून करण्यात आला याची चौकशी करायला हवी,” असे नवाब मलिक म्हणाले.
                       ADVERTISEMENT 
“एनसीबीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा शर्ट हजार-पाचशेपेक्षा महागडा नाही, पण समीर वानखेडेचा शर्ट ७० हजार रुपयांचा का असतो? प्रत्येक दिवशी नवे कपडे घालतात. मोदींच्याही पुढे गेलेत. पँट लाख रुपयांची, पट्टा २ लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घड्याळ ५०, ३०, २५ लाख रुपयांचं. मी याचे सर्व फोटो तुम्हाला देईल. या सर्व काळात त्यांनी जशाप्रकारचे कपडे घातलेत त्याची किंमतच ५-१० कोटी रुपये आहे. काय प्रामाणिक अधिकारी १० कोटींचे कपडे घालत असतील का? समीर वानखेडेंनी कोणतेही शर्ट पुन्हा घातलेले पाहिले नाही. दोन लाखांचे बुट घालणारा असा प्रामाणिक अधिकारी कोणी नसेल. आम्ही प्रार्थना करतो की देशातील सर्व प्रामाणिक अधिकाऱ्यांची अशाच प्रकारे प्रगती व्हावी. समीर वानखेडेंनी हजारो कोटींची वसूली केली आहे याची चौकशी व्हायला हवी,” असे नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांवरही उत्तर दिले आहे. “देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर आरोप केलेत. त्यांनी माझ्या जावयाच्या घरातून गांजा जप्त केल्याचं सांगितलं. मात्र माझ्या जावयाच्या घरातून कोणताही आपत्तीजनक वस्तू सापडली नाही, यासंदर्भात तुम्ही तुमचे निकटवर्तीय समीर वानखेडे यांनाही विचारू शकता. मलिक ६२ वर्ष या मुंबईत घालवली, कुणीतरी येऊन सांगावं की माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. माझे अंडरवर्ल्डशी संबंध होते, तर फडणवीस मुख्यमंत्री असताना गृहखातं त्यांच्याकडे होतं, त्यावेळी त्यांनी माझ्यावर कारवाई का केली नाही,” असे मलिक म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here