माझी तर जिरली पण, आता तुमचीपण जिरली – प्रा. राम शिंदे

0
300
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
“सगळ्यांची चेहरे बघतोय, सगळ्यांना कसं बरं वाटतयं, मोक्कारचं बरं वाटतयं, आता सांगता येईना अन बोलता येईना, निव्वळ अवघड जाग्यावरचं दुखणं झालंय, पण शेजारच्या गड्याला काम दाखवलं, कशी जिरवली म्हणता? माझी तर जिरली तर जिरली, पण आता जेव्हा मी बाहेर आलो, तेव्हा सगळी माणसं म्हणतात आमची जिरली” माजीमंत्री तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदें सरांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांचा चांगलाच क्लास घेतला. प्राध्यापक राहिलेले शिंदे यांनी खा.सुजय विखे यांच्या उपस्थितीत घेतलेला मार्मिक क्लास सध्या तालुक्यात चांगलाच चर्चेत आहे.
माजी मंत्री राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत जामखेड तालुक्यातील हळगावमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिंदे यांनी चौफेर फटकेबाजी केली. मागील दोन वर्षात निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्मिक मुलामा देत तिखट शब्दांत भाष्य केले. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची वेदनाही यावेळी त्यांनी बोलून दाखवली. तसेच आमदार रोहित पवार यांच्या कारभारावर जोरदार निशाणा साधला.
केंद्रीय मंत्रि नितीन गडकरी व खासदार सुजय विखे हे मोठ्या मनाची माणसं आहेत.  कामं मंजुर करतात आणि शरद पवारांना कार्यक्रमाला उपस्थित ठेवतात. आम्ही प्रयत्न केला आमच्या काळात प्रस्ताव गेले, खासदारांच्या काळात मंजूर झाले पण उपस्थित शरद पवारांना ठेवतेत,का तर? नातवाला उलीतीली संधी मिळावी. नाहीतर पारच उचलून टाकल्यावानी होईन अशी सडकून टीका करत शिंदे यांनी आ.रोहित पवारांना चांगलेच टार्गेट केले.
आपल्याच सभेत बोलता येतं, नाही तर दुसरीकडं लै अवघडयं, गडी राखणचं असत्येत, ज्या कार्यकर्त्याने जसा नाद केला तसाच मी पुरा करायचा प्रयत्न केला. पण तुम्ही माझा नादचं पुरा करून टाकला, धन्यवाद तुम्हाला असे म्हणत शिंदे यांनी पराभवाची वेदना बोलून दाखवली
आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कधी तरी संधी येते. त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रामाणिक, इमाने ऐतबारे प्रयत्न केला. जलयुक्त शिवाराच्या माध्यमांतून असेल किंवा इतर अनेक योजनांच्या माध्यमांतून असेल सगळ्यांच्या बांधापर्यंत, घरापर्यंत विकास पोहोचवण्याचे काम केलं. लोक म्हणतात काय केलं? अरे कांदा चाळी इतक्या दिल्या त्यात लोकं जाऊन राहायला लागली. पण आता दोन वर्षात एखादी कांदा चाळ मिळाली का ? कांदा चाळीचा जेवढा विदर्भाला कोटा होता तितका कोटा मी एकट्या कर्जत – जामखेड मतदारसंघाला आणला होता असे सांगत शिंदे यांनी मागील दोन वर्षांत थंडावलेल्या विकासावर बोट ठेवले.
मी मंत्री असताना कुणीही म्हणायचं करू का साहेबाला फोन, लगेच अधिकारी म्हणायचा नको घेतो ना तुझं नाव यादीत. नगरपर्यंत कलेक्टर ऑफीस ला जाऊन म्हणायचे करू का फोन पण आता तुम्हाला तलाठ्याच्या ऑफीसमध्ये कुणी इचारीना अशी परिस्थिती झालीय असे शिंदे म्हणाले.
मी मंत्री असतानाच्या काळात डिपी जळाली अन डिपी महिनाभर मिळाली नाही असा एक दिवस होता का ?  तिसऱ्या दिवसांत डिपी येऊन बसवायची, जळालेली घेऊन जायची. पण आता डिपीचं तर सोडाचं आता लाईट दोन दिवसालाय आणि ती पण सतत नाही.असा सगळा प्रकार चाललाय. विम्याचा पैसा नाही, डिप्या अजुन उतरायला सुरू व्हायच्या, भरणं अजून सुरू झाले नाही. जसं भरणं येईल तश्या जर डिप्या नाही उतरिवल्या अन त्या टायमाला माझं नाही ध्यान झालं तर मग बोला असे म्हणतं जनतेला मागील पाच वर्षाच्या कारभाराची शिंदे यांनी आठवण करून दिली.
लोकं म्हणत होती कुकडीचा कॅनाॅल यायचाय आपल्या भागात पण गेल्या दोन वर्षांपासून कर्जत तालुक्यात उन्हाळ्याचे आवर्तने बंद आहेत. तुम्ही तर बसा वाट बघत असे म्हणत अप्रत्यक्षपणे आमदार रोहित पवार यांच्यावर शिंदे यांनी निशाणा साधला.
मंत्री असताना पाच वर्षात बील नाही मागितलं, पाच वर्षात पदर भरून कुणाला डिपी लावावी लागली नाही. आता डिप्या पदर भरून आणाव्या लागतात. फोन करून बघा आमची डिपी उतरायला लागलेत डिपी जळालीय मग समोरून उत्तर येईल बिलं भरून टाक अन मग फोन कर,  वाह रं पठ्ठ्या हिच पाहिजं व्हतं असं लोक म्हणतात अशी खोचक टिका करत शिंदे यांनी रोहित पवारांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पाच दिवसानंतर निवडणुकीला दोन वर्षे पुर्ण होतील. मी दिवस मोजतोय. तुम्ही मोजतात की नाही मला माहित नाही. त्यामुळं आता तीन वर्षे अशीच कळ सोसायची. त्यांना गर्दी आवडत नाही तुम्ही करायची प्रयत्न करू नका. आता तुम्हाला कळलयं, मला कळलयं, कवा बवा माणसं म्हणायची इथून जायचे पण काचच खाली करत नव्हते.आता ती काच खाली नाही आणि दिसतही नाही असा टोला लगावत इकडून तिकडून कुणी काय केलं बोळीत गाटून, वेशीत आडवून , तोंड दाबून बुक्क्यांचा मार;असा सर्रास विकास चाललाय अशी घणाघाती टीका शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here