जामखेड न्युज – – –
परतीचा पावसाला आता सुरवात झालेली आहे. पुढील आठ दिवस राज्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पिकांची मोठी हानी झाली. आता आठवडाभर राज्यात पावसाची ही स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास व बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाला आहे. राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील आठवड्यात सोमवारनंतर पाऊस काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता आहे.
१४ ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आज (रविवारी) देखील नगर जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने नगर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्तकतेचे आदेश काढले आहे.
पावसाने शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तासभर चाललेल्या पावसामुळे नगर शहरातील सखल भागात पाणी साचले तर अनेक गल्ली आणि रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.
पावसाचे हे पाणी चारी छोटी वाहने, रिक्षामध्ये शिरले. पावसाने नागरिकांची तारंबळ उडाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील या पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आणखी आठ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठावर राहणाऱ्या गावांना सर्तकेतचा इशारा दिला असून पूरातून वाहने न चालविण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
बळीराजाच्या चिंतेत भर :- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साठून तळे बनले आहे. अनेक ठिकाणी चारा पिके, सोयाबिन हे पाण्यात गेली आहे. दुसरीकडे हेक्टरी हजारो रुपये खर्च करून केलेली कांदा लागडीचे काय होणार याची शेतकऱ्यांना काळजी आहे.






