जामखेड न्युज – – –
मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरातील कांचनवाडी भागात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांचनवाडी भागातील एका वाईन शॉपच्या समोरच्या गल्लीत महेश दिगंबर काकडे (१८, रा. नक्षत्रवाडी ) या युवकाचा धारदार शस्त्राने खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गंभीर गुन्ह्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
महेश हा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला असल्याचे आसपासच्या लोकांनी पाहिले. त्यानंतर तातडीने जखमी महेश याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी महेशला मृत घोषित केले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. ही घटना दारूच्या वादातून घडली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान महेशचा खून कोणी केला ? कोणत्या शस्त्राने केला ? खुनाचे कारण काय ? याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कराडे हे करित असून यासंबंधी प्रत्यक्षदर्शी आणि मृताच्या कुटुंबाचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. औरंगाबाद शहरात अशा प्रकारे हत्येच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे तरुणांना पोलिसांचा धाक उरला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.









