जामखेड न्युज – –
भाजपचे ज्येष्ठ नेते विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे . उत्तराखंडप्रमाणेच गुजरातमध्येही भाजपने धक्का तंत्राचा वापर करत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या पटेल यांना मुख्यमंत्री बनविले आहे . ज्येष्ठ नेते नितीन पटेल हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते . मात्र , तरीही भाजपने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने राजकीय निरीक्षकही चक्रावून गेले आहेत . भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत . ते पाटीदार समाजाचे नेते आहेत . पटेल हे 59 वर्षाचे आहेत . ते अहमदाबादच्या शिलाज येथील रहिवासी आहेत . त्यांनी सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा केला आहे .
भूपेंद्र पटेल हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. सामाजिक आणि राजकीय चळवळीत त्यांचा सहभाग राहिला आहे . 1999-2000मध्ये ते मेमनगर नगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. 2010 ते 2015 पर्यंत ते थलतेज वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते . 2015-17मध्ये ते अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. तसेच 2008-10 मध्ये ते एएमसी स्कूल बोर्डाचे उपाध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते मैदानात उतरले होते. यावेळी त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर साडे तीन वर्षानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली . ते पटेल संघटनांच्या सरदार धाम आणि विश्व उमिया फाऊंडेशनचे ट्रस्टीही आहेत . त्यांना मुख्यमंत्री केल्याने ते पाटीदार समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोठी भूमिका निभावू शकतात.
गुजरात विधानसभा निवडणुकीला अवघे 15 महिने बाकी आहेत. पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे . गुजरात हा नेहमीच भाजपचा गड राहिला आहे . त्यामुळे हा गड राखणे हे भाजप समोरचं आव्हान आहे . गेल्या निवडणुकीत भाजपला पाटीदार आंदोलन आणि काँग्रेसशी झुंज द्यावी लागली होती . यावेळी निवडणूक सोपी व्हावी , अधिक आव्हाने राहू नयेत म्हणून राज्याच्या प्रमुखपदी पटेल समाजातील नेता असणं महत्त्वाचं होतं. त्यामुळेच भाजपने भूपेंद्र पटेल यांना मैदानात उतरवलं आहे. पाटीदार समाजाला आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा हा एक प्रकार आहे , असं सांगण्यात येतं .
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक काळ गुजरातचे मुख्यमंत्री होते . त्यानंतर ते केंद्राच्या राजकारणात आले . मात्र , जाताना त्यांनी आनंदीबेन पटेल यांना मुख्यमंत्रीपदी बसवले त्यामुळे आनंदीबेन पटेल या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या . त्यानंतर काही काळाने आनंदीबेन यांना हटवून विजय रुपाणी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे देण्यात आली. सध्या गुजरातमध्ये सरकार बनविण्यात पाटीदार समाजाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे . पाटीदार आंदोलनामुळे हार्दिक पटेल हे नेते म्हणून उदयास आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपचं मोठं नुकसान झालं . बीबीसीच्या एका अहवालानुसार राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी पाटीदार समाजाची लोकसंख्या 14 टक्के आहे . तसेच पाटीदार समाजातील एकूण मतदार 21 टक्के आहेत . राज्यात या समाजातील अनेक आमदार आहेत . भाजपने आता पाटीदार समाजातून आलेल्या पटेलांकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली आहेत . भाजपचं हे मोठं पाऊल असून पाटीदार समाज आपल्याकडे वळवण्यासाठी टाकलेला हा डाव असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात . येणाऱ्या 2022 च्या निवडणुकीला किती यशस्वी होतात हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.
.









