जामखेड न्युज – – –
कृषि विद्यापीठाने प्रसारीत केलेल्या सुधारीत वाणांचा वापर करुन तुरीची लागवड व व्यवस्थापन व जोपासना केली तर एकरी १४ क्विंटलपर्यंत उत्पन्न घेणे शक्य आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले.कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ( शिराळ व शिंगवे केशव ता. पाथर्डी) येथे आयोजीत केलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक व शेतकर्यांची शेती शाळा या संयुक्त कार्यक्रमात शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की बिजप्रक्रिया करुनच तुरीची लागवड करावी. लागवडीनंतर ४५ दिवसांनी शेंडे खुडावेत. फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षीत पाणी द्यावे वेळेवर आंतरमशागत करुन तण व्यवस्थापन करावे. पीक फुलो ऱ्यात असतांना दोन टक्के युरीयाची आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना दोन टक्के पोटॅशची फवारणी करावी आणि किडी व रोगांचे वेळीच नियंत्रण करावे. अशा पध्दतीने तुरीची लागवड व जोपासणा केली तर तुरीचे १४ क्विंटलपर्यंत उत्पादन घेणे शक्य होते.
तूर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायाळ यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, तुरीवर दोनशेपेक्षा जास्त किडींचा प्रादुर्भाव होत असल्याची नोंद आढळुन आलेली आहे. परंतु या पिकाचे सर्वात जास्त नुकसान शेंगा पोखरणार्या अळीवर्गीय किडींमुळे होत असते आणि त्यांची संख्या ही फक्त चार ते पाच एवढीच आहे. त्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करण्यात येवून पीक कळी अवस्थेमध्ये असतांना पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडिरेक्टीन ३०० पीपीएम पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पीक ५० टक्के फुलोर्याच्या अवस्थेत असतांना एच.ए.एन.पी.व्ही. २५० एल.ई. २.० मिली प्रति लिटर पाणी या जैविक किडनाशकाची किंवा बॅसिलस थ्युरिनजेनेसीसची २.० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात फवारणी करावी. पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना इंडाक्झाकार्ब १४. ५ एस.सी.०.७ मिली प्रति लिटर पाणी किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ एस.जी. ०.४ ग्रॅम प्रति लिटर किंवा क्विनालफॉस २५ इ.सी. २.० मिली प्रति लिटर पाणी किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ एस.सी. ०.३ मिली प्रति लिटर पाणी यापैकी कुठल्याही किडनाशकांची सकाळी लवकर फवारणी करावी.
यावेळी शेतकऱ्यानी राबविलेल्या तूर आद्यरेखा प्रात्यक्षिकांची पाहणी करण्यात आली. या प्रसंगी कृषि सहाय्यक गणेश धोंडे व शिराळ आणि शिंगवे केशव या गावामधील तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कृषि सहाय्यक जयदिप खळेकर यांनी केले तर आभार कृषि सहाय्यक राहुल आठरे यांनी मानले.









