जामखेड न्युज – – –
सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना काळामध्ये अडचणीत सापडलेल्या प्रत्येक वारकऱ्याला महिन्याला पाच हजार रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक निर्णय घेऊ, असं आश्वासन देखील दिलं.
यासंदर्भात काल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये वारकऱ्यांना प्रति महिना ५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. याचा फटका कीर्तनकार, प्रवचनकार, वादक आणि गायक अशा लोकांना बसला आहे. याबरोबरच फडकरी महाराज मंडळींचे कार्यक्रम बंद आहेत. यामुळे महाराज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पाच हजार रुपये मानधन मिळावं, ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य असं संतपीठ उभं रहावं अशा मागण्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी या बैठकीत मांडल्या होत्या.
या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वारकऱ्यांना मानधन देण्याच्या प्रश्नाबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. यामुळे लवकरच आता राज्यातील महाराज मंडळींना दिलासा मिळणार असल्याचे विठ्ठल पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.









