जामखेड न्युज – – –
उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये माकडांच्या उच्छादामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. माकडांच्या उच्छादामुळे भाजप नेत्याच्या पत्नीचा जीव गेला असल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. कैराना शहरात माकडांचा धुमाकूळ सुरुच असतो. मात्र असे असूनही त्याकडे लक्ष दिले जात नाही. परिणामी माकडांनी केलेल्या हल्ल्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल चौहान यांची पत्नी आणि जिल्हा पंचायतच्या माजी सदस्या सुषमा चौहान यांचा मृत्यू झाला आहे.
भाजपचे माजी खासदार दिवंगत बाबू हुकम सिंह यांची पुतणी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल चौहान यांची पत्नी सुषमा देखील राजकारणात सक्रिय होत्या. प्रभाग क्रमांक 13 मधून त्या जिल्हा पंचायत सदस्याही होत्या. मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या मंदिरातून परत आल्या. घरी आल्यावर त्यांना घराच्या दुसऱ्या मजल्यावर माकडांचा कळप दिसला.
दरम्यान या माकडांना सुषमा हुसकावून लावण्यासाठी गेले असता अचानक माकडांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सुषमा यांचा तोल गेला आणि त्या पायऱ्यांवरून घसरुन थेट सरळ जमिनीवर आदळल्या. दरम्यान सुषमा यांना पती अनिल चौहान आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी तात्काळ शामली येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. जिथे डॉक्टरांनी सुषमा चौहान यांना मृत घोषित केलं. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली होती. हजारो लोकांच्या उपस्थितीत मायापूर फार्म हाऊसवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.









