सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या जामखेड मध्ये भीक मागून महामार्ग दुरुस्तीसाठी निधी उभारण्याची वेळ! प्रशासनाला पाठवणार जमा झालेली रक्कम! तीन वर्षांपासून NH-548D चे काम रखडले, खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीने नागरिक हैराण, संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले
सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या जामखेड मध्ये भीक मागून महामार्ग दुरुस्तीसाठी निधी उभारण्याची वेळ! प्रशासनाला पाठवणार जमा झालेली रक्कम!
तीन वर्षांपासून NH-548D चे काम रखडले, खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीने नागरिक हैराण, संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डीच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांपासून महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने जामखेडकरांना दररोज खड्डे, धूळ आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वारंवार निवेदने, आंदोलने आणि उपोषणे करूनही संबंधित प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर संतप्त नागरिकांनी शनिवारी (दि. २१ नोव्हेंबर) अनोखे ‘भीक मागो आंदोलन’ करत प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे निधी नसेल तर आम्हीच भीक मागून पैसे जमा करून देतो, असा उपरोधिक संदेश या आंदोलनातून देण्यात आला.
शहरातील राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, धोकादायक उंचवटे, अर्धवट सिमेंट रस्ते आणि सर्वत्र पसरलेली धूळ यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे महामार्गालगत वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. व्यापारी, वाहनचालक, पादचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे. अपघातांचा धोका वाढत असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीला अपेक्षित गती मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.विशेष म्हणजे राज्यात वजनदार नेत्यांच्या म्हणजे विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या जामखेड मध्ये अनोखे आंदोलन करण्यात आले आहे याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन केले. या आंदोलनातून राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. महामार्गाचे काम पूर्ण करण्याऐवजी संबंधित विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विशेष म्हणजे, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना स्वतः भीक मागण्याची वेळ आली आहे, हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर केलेला उपरोधिक प्रहार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना मणक्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषद यांच्यात समन्वय नसून प्रत्येक विभाग दुसऱ्यावर जबाबदारी ढकलत आहे. तसेच महामार्गावरील विजेच्या खांबांवर अनधिकृत डिजिटल बोर्ड लावले जात असून त्यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ॲड. घनश्याम राळेभात यांनी मतदारसंघात तीन आमदार असतानाही राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नसल्याची टीका केली. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराला निधी कमी पडत असेल तर नागरिक भीक मागून पैसे जमा करून देण्यास तयार आहेत. भीक मागून जमा झालेली रक्कम प्रशासनाला देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संदीप बोराटे यांनीही रखडलेल्या महामार्गाच्या कामावरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठेकेदाराला काम पूर्ण करण्यासाठी पैसे कमी पडत असतील तर नागरिक भीक मागून पैसे देण्यास तयार आहेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. सुनील जगताप यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे जामखेडच्या बाजारपेठेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितले. शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडी यामुळे व्यापारी व नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाचा जाहीर निषेध करत त्यांनी राज्यात फिरणारे आणि स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणवणारे आता कुठे गेले, असा सवाल उपस्थित केला.
बाबासाहेब चंदन यांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे सांगितले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर प्रशासनाला भीक मागून पैसे देण्याची वेळ आली आहे. याच निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सागर सदाफुले यांनीही नागरिकांच्या संतप्त भावना व्यक्त करत भीक मागून जमा झालेल्या पैशांतून रस्त्यावरील खड्डे बुजवले तरी अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, बाबासाहेब चंदन, सुनील जगताप, राष्ट्रीय समाज पक्षाचे विकास मासाळ, ॲड. घनश्याम राळेभात, अशोक पोटफाडे, आण्णा माकुडे, सागर सदाफुले, प्रकाश काळे, महेश पवार, अनिल पाटील, सागर घुमरे, जगन्नाथ म्हेत्रे, सद्दाम तांबोळी, भाऊ चिंचकर, प्रमोद तांदळे, संदीप बोराटे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चौकट भीक मागून जमा केलेली रक्कम प्रशासनाला पाठवणार! सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यासाठी प्रशासनाला वेळ मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आंदोलनादरम्यान भीक मागून जमा करण्यात आलेली रक्कम संबंधित प्रशासनाला पाठविण्यात येणार आहे. नागरिकांना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भीक मागण्याची वेळ येणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. तीन वर्षांपासून रखडलेला महामार्ग, रोजचा त्रास आणि वारंवारच्या मागण्यांनंतरही न मिळालेला दिलासा, यामुळे जामखेडकरांनी आता आंदोलनाचा अनोखा मार्ग स्वीकारला आहे. भीक मागून जमा केलेल्या पैशांमुळे तरी प्रशासनाला जाग येणार का आणि NH-548D चे काम प्रत्यक्षात मार्गी लागणार का, हा प्रश्न आता जामखेडकरांकडून उपस्थित केला जात आहे.