Friday, November 20, 2026
Home शैक्षणिक बातम्या ल. ना. होशिंगचा माजी विद्यार्थी देशपातळीवर चमकला! डॉ. ओम कोल्हेंनी INI-CET मध्ये...

ल. ना. होशिंगचा माजी विद्यार्थी देशपातळीवर चमकला! डॉ. ओम कोल्हेंनी INI-CET मध्ये मिळवला ५४३ वा क्रमांक, विद्यालयाचा अभिमान उंचावला! विद्यार्थ्यांना दिला यशाचा कानमंत्र – कामाशी प्रामाणिक राहा, स्वप्न मोठी पाहा!

0
4
ल. ना. होशिंगचा माजी विद्यार्थी देशपातळीवर चमकला! डॉ. ओम कोल्हेंनी INI-CET मध्ये मिळवला ५४३ वा क्रमांक, विद्यालयाचा अभिमान उंचावला!  विद्यार्थ्यांना दिला यशाचा कानमंत्र – कामाशी प्रामाणिक राहा, स्वप्न मोठी पाहा!

जामखेड न्युज – – – – – 

ल. ना. होशिंगचा माजी विद्यार्थी देशपातळीवर चमकला! डॉ. ओम कोल्हेंनी INI-CET मध्ये मिळवला ५४३ वा क्रमांक, विद्यालयाचा अभिमान उंचावला!

विद्यार्थ्यांना दिला यशाचा कानमंत्र – कामाशी प्रामाणिक राहा, स्वप्न मोठी पाहा!

देशपातळीवरील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेच्या AIIMS PG / INI-CET परीक्षेत जामखेडचे सुपुत्र डॉ. ओम उमा संजय कोल्हे यांनी घवघवीत यश संपादन करत ऑल इंडिया रँक ५४३ मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जामखेडच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे, ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या डॉ. ओम कोल्हे यांचा विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

देशभरातून तब्बल ६१ हजार ८१२ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३४ हजार २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अशा मोठ्या स्पर्धेत डॉ. ओम यांनी ५४३ वा क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. जामखेडमधून या परीक्षेत यश संपादन करणारे ते पहिले विद्यार्थी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित सत्कार समारंभात डॉ. ओम कोल्हे यांचा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. सन २०१७ च्या दहावीच्या बॅचचा विद्यार्थी असल्याचे सांगत, याच विद्यालयात आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आज या यशापर्यंत पोहोचता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉक्टर सुनील कटारिया, माजी सचिव शशिकांत देशमुख, माजी खजिनदार राजेश मोरे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या आजी – माजी विद्यार्थ्यांच्या यशाचा आलेख उंचावत आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. ओम कोल्हे म्हणाले की, “आपल्या कामाशी प्रामाणिक राहा, हीच गोष्ट भविष्यात खऱ्या अर्थाने उपयोगी पडते. आयुष्यात स्वप्न मोठी पाहा, ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. स्वतःच्या यशातून आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव मोठे करा. आपल्या यशामध्ये आई-वडिलांसह शिक्षकांचा मोठा वाटा असतो.

शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच मी घडलो.”
त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच सातत्य, शिस्त आणि प्रामाणिक प्रयत्न यांचे महत्त्व पटवून दिले. आपल्या यशाचा प्रवास सांगताना त्यांनी शाळेतील शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि मार्गदर्शन हेच यशाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे नमूद केले.
यावेळी डॉ. ओम यांचे वडील डॉ. संजय कोल्हे यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते. यश मिळविण्यासाठी अभ्यासाला पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली पाहिजे.

विद्यालयाचे प्राचार्य बी. ए. पारखे यांनी डॉ. ओम कोल्हे यांच्या यशाचे कौतुक करत विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याने देशपातळीवर मिळवलेले यश ही संपूर्ण शाळेसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. अशा विद्यार्थ्यांच्या यशामुळे सध्याच्या विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्राचार्य बी ए पारखे, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, सर्व अध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक अनिल देडे यांनी तर आभार पोपट जगदाळे यांनी मानले.

चौकट

ज्या विद्यालयाच्या वर्गखोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवले, त्याच विद्यालयात देशपातळीवरील यशानंतर सन्मान स्वीकारण्याचा डॉ. ओम कोल्हे यांचा हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यांच्या यशामुळे ल. ना. होशिंग विद्यालयासह संपूर्ण जामखेड तालुक्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!