Sunday, November 15, 2026
Home ताज्या बातम्या शेजाऱ्यांना कृष्णा-भीमेचे पाणी, जामखेडच्या वाट्याला ठणठणाट! सहा टीएमसीसाठी राळेभातांचा न्यायालयीन लढ्याचा इशारा!...

शेजाऱ्यांना कृष्णा-भीमेचे पाणी, जामखेडच्या वाट्याला ठणठणाट! सहा टीएमसीसाठी राळेभातांचा न्यायालयीन लढ्याचा इशारा! उजनी (दहिगाव) योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी

0
2
शेजाऱ्यांना कृष्णा-भीमेचे पाणी, जामखेडच्या वाट्याला ठणठणाट! सहा टीएमसीसाठी राळेभातांचा न्यायालयीन लढ्याचा इशारा!  उजनी (दहिगाव) योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी

जामखेड न्युज – – – – – 

शेजाऱ्यांना कृष्णा-भीमेचे पाणी, जामखेडच्या वाट्याला ठणठणाट! सहा टीएमसीसाठी राळेभातांचा न्यायालयीन लढ्याचा इशारा!

उजनी (दहिगाव) योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी

 

जामखेड तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून आता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शेजारील तालुक्यांना कृष्णा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाचे पाणी मिळत असताना जामखेडला मात्र या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. जामखेडवर वर्षानुवर्षे पाण्याच्या बाबतीत अन्याय होत असून हा अन्याय आता सहन केला जाणार नाही. गरज पडल्यास न्यायालयात जाऊन हक्काचे पाणी मिळवण्यासाठी कायदेशीर लढा उभारू, असा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
जामखेड शहरासह संपूर्ण तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. १४) आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. राळेभात यांनी जलसंपदा विभागाच्या धोरणावर आणि जामखेडच्या पाणीप्रश्नाकडे होत असलेल्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली.

शेजारचे तालुके पाण्याने समृद्ध, जामखेड मात्र तहानलेले!
प्रा. राळेभात म्हणाले की, कृष्णा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाचा लाभ शेजारील आष्टीसह अनेक तालुक्यांना मिळत असताना जामखेडला या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून वगळण्यात आल्याचा प्रश्न गंभीर आहे. आष्टी, पाटोदा, भूम, परांडा, करमाळा, बारामती आणि इंदापूर या तालुक्यांचा प्रकल्पाशी संबंध जोडला जात असताना जामखेडला मात्र पाण्यापासून दूर का ठेवले जात आहे? जामखेडकरांनी नेमके काय पाप केले आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

कुकडी प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ कर्जत, करमाळा आणि आष्टी परिसराला मिळत असताना जामखेडच्या वाट्याला मात्र कायम पाणीटंचाईच येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. शेजारच्या भागात पाणी पोहोचत असताना जामखेडमधील शेतकरी आणि नागरिकांनी तहानलेलेच राहायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टँकर भरण्यासाठीही तालुक्यात पाणी नाही!
जामखेडमधील पाणीटंचाईचे वास्तव मांडताना प्रा. राळेभात म्हणाले की, तालुक्यात पाटपाण्याची पुरेशी सोय नसल्यामुळे शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. दर दोन-तीन वर्षांनी तालुक्याला तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. यंदा परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, टँकर भरण्यासाठीदेखील तालुक्यात पुरेसे पाणी उपलब्ध नाही. परिणामी कर्जत तालुक्यातील मांदळी येथून पाणी आणण्याची वेळ आली आहे.

जामखेड शहरात कधी १५ दिवस, तर काही भागांत महिनाभर नळाला पाणी येत नाही. महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ३० वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. ही परिस्थिती केवळ तात्पुरत्या उपाययोजनांनी बदलणार नसून कायमस्वरूपी जलस्रोत उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सहा टीएमसी पाणी द्या; दोन्ही योजना तातडीने पूर्ण करा!
जामखेडला हक्काचे पाणी मिळवण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती असल्याचे सांगत प्रा. राळेभात म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खात्याची जबाबदारी आहे, तर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे जामखेडचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे जामखेडचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याची ही महत्त्वाची संधी आहे.
जामखेड तालुक्याला कृष्णा खोऱ्यातून सहा टीएमसी पाणी मिळाले पाहिजे. उजनी-जामखेड पाईपलाईन योजना रखडू न देता तातडीने पूर्ण करावी. शहरासह ग्रामीण भागातील पाणीप्रश्न कायमचा सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.

बंदनंतर आता न्यायालयीन लढ्याचा इशारा!
जामखेडच्या पाणीप्रश्नासाठी रविवारी (दि. १५) विविध राजकीय पक्ष आणि संघटनांच्या वतीने शहर बंदची हाक देण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या बंदमध्ये सहभाग घेतला होता.
या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रा. मधुकर राळेभात यांनी दिलेला न्यायालयीन लढ्याचा इशारा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. जामखेडला हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आता केवळ मागण्यांवर न थांबता शासनदरबारी ठोस निर्णय होणे आवश्यक आहे. अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावून कायदेशीर मार्गाने लढा देण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जामखेडला पाणी मिळणार की पुन्हा आश्वासनांवरच बोळवण होणार? कृष्णा-भीमेच्या पाण्याचा प्रश्न आता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर कोणते वळण घेतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!