Home ताज्या बातम्या जामखेडच्या पाणी व रस्ता प्रश्नावर भाजपाच्याच ज्येष्ठ नेत्यांचा एल्गार! प्रा. मधुकर...

जामखेडच्या पाणी व रस्ता प्रश्नावर भाजपाच्याच ज्येष्ठ नेत्यांचा एल्गार! प्रा. मधुकर राळेभात यांचा सत्ताधारी भाजपाला घरचा आहेर, १५ ते २० दिवस पाण्याविना नागरिक, रखडलेल्या कामांवर प्रशासनाला धारेवर धरले!

0
3
जामखेडच्या पाणी व रस्ता प्रश्नावर भाजपाच्याच ज्येष्ठ नेत्यांचा एल्गार!  प्रा. मधुकर राळेभात यांचा सत्ताधारी भाजपाला घरचा आहेर, १५ ते २० दिवस पाण्याविना नागरिक, रखडलेल्या कामांवर प्रशासनाला धारेवर धरले!

जामखेड न्युज – – – – – 

जामखेडच्या पाणी व रस्ता प्रश्नावर भाजपाच्याच ज्येष्ठ नेत्यांचा एल्गार!

प्रा. मधुकर राळेभात यांचा सत्ताधारी भाजपाला घरचा आहेर, १५ ते २० दिवस पाण्याविना नागरिक, रखडलेल्या कामांवर प्रशासनाला धारेवर धरले!

शहरातील तीव्र पाणीटंचाई, उजनी पाणीपुरवठा योजनेचे रखडलेले काम, रस्त्यांची दुरवस्था आणि कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पातील जामखेडच्या पाणीहक्काचा प्रश्न यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी आज (दि. १४) पत्रकार परिषद घेऊन परखड भूमिका मांडली. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपामधीलच ज्येष्ठ नेत्याने जामखेडच्या प्रश्नांवर उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू झाली आहे.

१४ ते २० दिवसांनी पाणी; नागरिकांचे हाल!

जामखेड शहरात सध्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. काही भागांत १४ ते १५ दिवसांनी, तर काही ठिकाणी तब्बल २० दिवसांनंतर पाणी मिळत आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी विकत घेण्याची वेळ आली असून अनेकांना पैसे देऊनही पुरेसे पाणी मिळत नसल्याचे राळेभात यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात येऊन गेले, मात्र भुतवडा तलावात पाणी असल्याचा चुकीचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांनी दिल्यामुळे शहरासाठी टँकर मंजूर होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तीत जास्त टँकर तातडीने सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

जामखेडला ६ टीएमसी पाणी कधी मिळणार?
कुकडीचे पाणी आणि कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचे पाणी जामखेड तालुक्याला मिळावे, ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नियमानुसार जामखेड तालुक्याला कृष्णा खोऱ्यातून ६ टीएमसी पाणी मिळाले पाहिजे, असे राळेभात यांनी स्पष्ट केले.

पाटोदा, आष्टी, धाराशिव, सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील तालुक्यांना पाणी मिळत असताना जामखेड तालुका मात्र पाण्यापासून वंचित का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जामखेडच्या शेतकऱ्यांना केवळ ऊसतोडणीसाठीच ठेवायचे आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

तीन वर्षांपासून रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य!
उजनी पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन आणि शहरातील रस्त्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. कंत्राटदार काम करीत नाहीत आणि अधिकारी एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून रस्ते उखडलेले असल्याने नागरिकांना धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
धुळीमुळे हजारो नागरिकांना सर्दी, खोकला यांसारख्या आरोग्यविषयक तक्रारींचा सामना करावा लागत असून ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याची टीका त्यांनी केली.

‘विरोधक झोपले, सत्ताधारी आलबेल!’
जामखेडमधील प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी अपेक्षित आवाज उठवला जात नसल्याची खंत प्रा. राळेभात यांनी व्यक्त केली. शहरातील पाणीप्रश्न, रस्ते आणि विकासकामांबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी जामखेडच्या प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा नागरिकांना आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

सत्ताधारी भाजपाच्याच ज्येष्ठ नेत्याने पत्रकार परिषदेतून शहरातील प्रश्नांवर नाराजी व्यक्त केल्याने आता प्रशासन, पालकमंत्री आणि स्थानिक सत्ताधारी या मागण्यांवर काय भूमिका घेतात, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!