जामखेड न्युज – – – – –
जिल्हा बँकेच्या मतदानाआधीच राजकीय रणधुमाळी! गैरप्रकाराची भीती व्यक्त करत खासदार निलेश लंके, लोखंडे, ढाकणे, काकडे यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे!
बूथ कॅप्चरिंगच्या भीतीने सहकार परिवर्तन पॅनल आक्रमक, CCTV अन् पोलीस बंदोबस्ताची मागणी!

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान २ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार असून, मतदानापूर्वीच निवडणुकीच्या वातावरणात खळबळ उडाली आहे. मतदान प्रक्रियेत गैरप्रकार होण्याची भीती व्यक्त करत सहकार परिवर्तन पॅनलने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पॅनलच्या नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले आहे.

सत्तेच्या गैरवापराची भीती; निष्पक्ष निवडणुकीची मागणी
दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सहकार परिवर्तन पॅनलच्या वतीने सत्ताधारी पॅनलकडून राजकीय प्रभाव आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर होण्याची शक्यता निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार घडण्याची तसेच मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होण्याची भीती व्यक्त करत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर CCTV कॅमेरे लावा!


