जामखेडमध्ये शिवशौर्याचा जागर! हजारो शिवभक्तांच्या साक्षीने रावण दहन, दुर्गामाता महादौडीचा दिमाखदार समारोप! २५ वर्षांची परंपरा कायम; लोहारदेवी मंदिर परिसरात शिवकालीन मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची मागणी पुन्हा ऐरणीवर!
२५ वर्षांची परंपरा कायम; लोहारदेवी मंदिर परिसरात शिवकालीन मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची मागणी पुन्हा ऐरणीवर!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, आई दुर्गामातेचा गजर, शिवकालीन मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके आणि हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत रावण दहन अशा उत्साहपूर्ण वातावरणात जामखेडमध्ये विजयादशमीचा सण साजरा करण्यात आला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुर्गामाता महादौडीचा समारोप सोमवारी, २० ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात झाला. यानिमित्त शहरात भक्ती, शौर्य आणि शिवप्रेमाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
२५ वर्षांची परंपरा अखंड सुरू! जामखेड शहरात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गेल्या २५ वर्षांपासून दुर्गामाता दौडीची परंपरा जपली जात आहे. नवरात्रातील घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत दररोज शेकडो शिवप्रेमींच्या सहभागातून ही दौड पार पडली. यंदाही शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजयादशमीच्या दिवशी आयोजित महादौडीने या परंपरेची दिमाखदार सांगता झाली.
दुर्गामाता मंदिरापासून महादौडीला प्रारंभ विजयादशमीच्या दिवशी बाजारतळ येथील दुर्गामाता मंदिरापासून महादौडीला प्रारंभ झाला. शहरातील विविध ठिकाणी महादौडीचे पूजन करण्यात आले. महापुरुषांच्या जयघोषाने आणि शिवरायांच्या प्रेरणादायी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ठिकठिकाणी नागरिकांनी महादौडीचे स्वागत केले. लोहारदेवी मंदिरात महाआरती अन् शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार! खर्डा रोडवरील जामखेडचे ग्रामदैवत श्री लोहारदेवी मंदिर येथे महादौड पोहोचल्यानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर शस्त्रपूजन करून शिवकालीन मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
लाठी-काठी, दांडपट्टा आणि तलवारबाजी यांसारख्या पारंपरिक मर्दानी खेळांचे लहान मुला-मुलींनी सादर केलेले चित्तथरारक सादरीकरण उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. चिमुकल्या मावळ्यांच्या चपळ हालचाली, शस्त्रकौशल्य आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित जामखेडकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या प्रात्यक्षिकांतून शिवकालीन युद्धकलेचा वारसा जतन करण्याचा आणि नव्या पिढीत शौर्य, शिस्त व स्वाभिमानाची भावना रुजवण्याचा संदेश देण्यात आला. यानंतर रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत विजयादशमीचा उत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
पन्हाळगड ते पावनखिंड मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड तालुकाध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी आगामी पन्हाळगड ते विशाळगड मार्गे पावनखिंड या ऐतिहासिक किल्ले मोहिमेत शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे शौर्य आणि मावळ्यांचे बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा मोहिमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
खर्डा चौकात शिवरायांच्या स्मारकाची मागणी पुन्हा ऐरणीवर! दुर्गामाता महादौडीच्या निमित्ताने जामखेडकरांनी खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी पुन्हा एकदा मांडली. शहरातील असंख्य शिवभक्त आणि ग्रामस्थांनी या मागणीकडे लक्ष वेधले. खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. विजयादशमीच्या पवित्र दिनी आई भवानीने लोकप्रतिनिधींना स्मारक उभारणीसाठी सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थनाही करण्यात आली.
शिस्तबद्ध नियोजनाचे जामखेडकरांकडून कौतुक या कार्यक्रमाला हजारो माता-भगिनी, शिवप्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दुर्गामाता दौडीचे शिस्तबद्ध नियोजन, शिवकालीन परंपरेचे दर्शन आणि उत्साहपूर्ण वातावरण याबद्दल जामखेडकरांनी आयोजकांचे कौतुक केले. ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. शिवभक्ती, शौर्य, ऐतिहासिक परंपरेचे जतन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची मागणी अशा विविध मुद्द्यांमुळे यंदाची दुर्गामाता महादौड जामखेडकरांच्या स्मरणात राहणारी ठरली.
चौकट चिमुकल्या मावळ्यांचा शौर्याविष्कार!
लाठी-काठी, दांडपट्टा अन् तलवारबाजीने जिंकली जामखेडकरांची मने! श्री लोहारदेवी मंदिर परिसरात लहान मुला-मुलींनी सादर केलेल्या शिवकालीन मर्दानी खेळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. लाठी-काठी, दांडपट्टा आणि तलवारबाजीतील कौशल्यपूर्ण हालचालींनी शिवकालीन युद्धकलेचा जिवंत अनुभव दिला. चिमुकल्या मावळ्यांचा आत्मविश्वास, शिस्त आणि धाडसी सादरीकरण पाहून उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. शिवरायांचा पराक्रम केवळ इतिहासात नाही, तर नव्या पिढीच्या मनामनांत रुजत असल्याचे चित्र या मर्दानी खेळांतून पाहायला मिळाले.