Sunday, October 18, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये दुर्गामाता दौडीचा २५ वर्षांचा अखंड जागर! विजयादशमीला भगव्या ध्वजांचा महासागर, महादौडीनंतर...

जामखेडमध्ये दुर्गामाता दौडीचा २५ वर्षांचा अखंड जागर! विजयादशमीला भगव्या ध्वजांचा महासागर, महादौडीनंतर होणार रावण दहन! पहाटे ५.३० वाजता ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष, २५ वर्षांची परंपरा जपण्यासाठी शिवभक्त सज्ज!

0
2
जामखेडमध्ये दुर्गामाता दौडीचा २५ वर्षांचा अखंड जागर! विजयादशमीला भगव्या ध्वजांचा महासागर, महादौडीनंतर होणार रावण दहन!  पहाटे ५.३० वाजता ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष, २५ वर्षांची परंपरा जपण्यासाठी शिवभक्त सज्ज!

जामखेड न्युज – – – – – – – 

जामखेडमध्ये दुर्गामाता दौडीचा २५ वर्षांचा अखंड जागर! विजयादशमीला भगव्या ध्वजांचा महासागर, महादौडीनंतर होणार रावण दहन!

पहाटे ५.३० वाजता ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष, २५ वर्षांची परंपरा जपण्यासाठी शिवभक्त सज्ज!

हिंदवी स्वराज्याची प्रेरणा, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि युवकांमध्ये शारीरिक व मानसिक सामर्थ्य निर्माण करण्याचा संदेश देणारी जामखेडची मानाची श्री दुर्गामाता दौड यंदा २५ वर्षांची अखंड परंपरा जपत उत्साहात सुरू आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या दौडीमुळे जामखेड शहरातील वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले आहे.

शहराचे आराध्य ग्रामदैवत श्री लोहार देवी आणि श्री दुर्गामातेच्या नावाने सुरू असलेल्या या दौडीत दररोज पहाटे ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील शनी मारुती मंदिर येथून प्रारंभ होतो. पारंपरिक वेशभूषा, कपाळावर टिळा आणि हातात भगवा ध्वज घेऊन शेकडो धारकरी, शिवभक्त आणि युवक या दौडीत सहभागी होतात. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात खर्डा रोडवरील ग्रामदैवत श्री लोहार देवी मंदिरापर्यंत धावत जाऊन देवीची महाआरती करण्यात येते. त्यानंतर दौडीची सांगता होते.

गेली २५ वर्षे या उपक्रमातून जामखेडमध्ये हिंदवी स्वराज्याचे विचार, शिस्त, व्यायाम आणि संघटनात्मक एकतेचा संदेश दिला जात आहे. देशभरात दुर्गामाता दौड आयोजित व्हावी आणि युवकांमध्ये शारीरिक व मानसिक बळ निर्माण व्हावे, या उद्देशाने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी या उपक्रमाला प्रेरणा दिली. त्यांच्याच प्रेरणेतून जामखेडमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ही परंपरा अविरतपणे सुरू आहे.

विजयादशमीला भव्य महादौड जामखेडमध्ये रंगणार रावण दहन!
नवरात्रोत्सवातील या दौडीचा समारोप विजयादशमीच्या दिवशी भव्य महादौडीने होणार आहे. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५.१५ वाजता जामखेड येथील बाजारतळावरील दुर्गामाता मंदिरातून या महादौडीला प्रारंभ होणार आहे.
महादौड श्री लोहार देवी मंदिर येथे पोहोचल्यानंतर देवीची महाआरती करण्यात येईल. त्यानंतर पारंपरिक रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. या महादौडीत हजारो धारकरी, शिवभक्त आणि युवक सहभागी होण्याची अपेक्षा असून, भगव्या ध्वजांच्या साक्षीने आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात विजयादशमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

शिवभक्तांना सहभागी होण्याचे आवाहन
जामखेडची २५ वर्षांची ही परंपरा अधिक व्यापक व्हावी, युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त आणि संघटनभावना वृद्धिंगत व्हावी, यासाठी सर्व शिवभक्त, युवक आणि जामखेडकर नागरिकांनी विजयादशमीच्या महादौडीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जामखेड तालुकाध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांनी केले आहे.

२५ वर्षांची अखंड परंपरा, भगव्या ध्वजांची शान आणि शिवरायांच्या विचारांचा जागर! विजयादशमीच्या महादौडीकडे आता जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!