आदिवासी पारधी समाजाच्या मागण्यांची दखल! घरकुलासाठी जागा, उदरनिर्वाहासाठी जमीन देण्याच्या तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
आदिवासी पारधी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. घरासाठी जागा मालकी हक्काने मिळावी, उदरनिर्वाहासाठी भूमिहीन पारधी समाजातील कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून द्यावी, तसेच वनहक्क दावे दाखल करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने राबवावी, अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
संपूर्ण आदिवासी पारधी विकास कृती समिती व भटके विमुक्त संयोजन समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अॅड. अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात संविधानाच्या प्रस्ताविकेला पुष्प अर्पण करून तसेच संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी आदिवासी पारधी समाजाच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. पारधी समाजाच्या मागण्यांसाठी ग्रामपंचायतीने ठराव घ्यावेत, वनहक्क समित्या स्थापन करण्यासाठी तातडीने ग्रामसभा घेण्यात यावी, तसेच वनहक्क दावे दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
वनहक्क दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार यावेळी तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार, वनहक्क दावे दाखल करण्यासाठी यापूर्वी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ अशी मुदत होती. मात्र, संबंधित दावे दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले. तसेच आदिवासी पारधी समाजातील कुटुंबांच्या घराच्या जागा मालकी हक्काने त्यांच्या नावावर करण्याबाबत कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले.
भूमिहीन कुटुंबांना शासकीय जमिनीतून हक्क देण्याचा पाठपुरावा राखीव वने, महाराष्ट्र शासनाच्या तसेच वन विभागाच्या अखत्यारितील उपलब्ध शासकीय जमिनींच्या संदर्भात भूमिहीन आदिवासी पारधी समाजातील व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत नियमानुसार कार्यवाही व पाठपुरावा केला जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. संबंधित हक्कपट्टे नियमानुसार तयार करून पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याबाबत आश्वासन देण्यात आले. तहसीलदारांनी विविध मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाच्या आश्वासनानंतर पारधी समाजाच्या मागण्यांवर पुढील कार्यवाहीकडे आता आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनावेळी तुकाराम पवार, दिसेना पवार, रंगीशा काळे, कायदेशीर पवार, शितल पवार, काजोरी पवार, ईश्वर काळे, शक्तिमान काळे, सर्वेनात काळे, सत्यवान काळे, दहिसर भोसले, आसराबाई काळे, दिनेश काळे, जिंदेभान काळे, अश्विनी भोसले, चंपा पवार, रवींद्र काळे, त्रिषाली काळे, सुरज भोसले यांच्यासह आदिवासी पारधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनाला चांगदेव आप्पा सरोदे, सोमनाथ भैलुमे, पोपट शेटे, भाऊसाहेब जावळे, वस्ताद संतोष आखाडे, पैलवान विजय साळवे, पप्पू चव्हाण आदींनी पाठिंबा दिला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुकाराम पवार, दिसेना पवार, रंगीशा काळे व इतर कार्यकर्त्यांनी नियोजन केले.