बीड रोडपासून अतिक्रमण हटाव मोहिमेचा श्रीगणेशा , महामार्गाच्या दोन्ही बाजूंना गटारापासून १० फुटांपर्यंत कारवाई — प्रशासनाची संयुक्त मोहीम
जामखेड शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या तसेच महामार्गाच्या हद्दीत करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात अखेर प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता बीड रोडवरील शासकीय दूध डेअरी परिसरापासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गाच्या गटारापासून दोन्ही बाजूंना सुमारे तीन मीटर अर्थात दहा फूट अंतरातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येत आहे. शहरातील तात्पुरती तसेच कायमस्वरूपी स्वरूपाची अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या कारवाईसाठी महसूल प्रशासन, जामखेड नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे मैदानात उतरले आहे. तहसीलदार शितल सावळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आपल्या पथकांसह कारवाईच्या ठिकाणी उपस्थित आहेत.
जामखेड शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होता. रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या टपऱ्या, दुकाने तसेच इतर अतिक्रमणांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. परिणामी शहरातील मुख्य रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. महामार्गाच्या कामावरही याचा परिणाम झाल्याने रस्ता पूर्णत्वास जाण्यास विलंब होत असल्याची स्थिती होती.
तीन वर्षांपासून रखडलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला अखेर सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास तसेच रस्ते मोकळे होण्यास या कारवाईचा फायदा होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाने ही कारवाई केवळ एका भागापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जाणार आहे.
प्रशासनाचा फौजफाटा मैदानात अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. महसूल, नगरपरिषद, महामार्ग विभाग आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी संयुक्तपणे कारवाईवर लक्ष ठेवून आहेत.
नागरिकांकडून स्वागत शहरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक कोंडी कमी होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सुरू केलेल्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. मात्र, कारवाई करताना प्रशासनाने सर्व अतिक्रमणांवर समान निकषाने आणि नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.