Monday, October 5, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा कहर! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुकलीचा डोळा निकामी;...

जामखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा कहर! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुकलीचा डोळा निकामी; तिघे गंभीर जखमी बोराटे वस्ती हादरली, चिमुकलीवर पुण्यात शस्त्रक्रिया, उपचारासाठी १० लाखांचा खर्च

0
5
जामखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा कहर! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुकलीचा डोळा निकामी; तिघे गंभीर जखमी बोराटे वस्ती हादरली, चिमुकलीवर पुण्यात शस्त्रक्रिया, उपचारासाठी १० लाखांचा खर्च

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा कहर! पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुकलीचा डोळा निकामी; तिघे गंभीर जखमी

बोराटे वस्ती हादरली, चिमुकलीवर पुण्यात शस्त्रक्रिया, उपचारासाठी १० लाखांचा खर्च

जामखेड शहरात भटक्या तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. खर्डा रोडवरील बोराटे वस्ती परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला करून दीड वर्षाच्या चिमुकलीसह तिघांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात चिमुकलीच्या डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून दुर्दैवाने तिचा डावा डोळा पूर्णपणे निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

घरासमोर खेळत असताना कु. जागृती सौरभ बेल्हेकर (वय १.५ वर्षे) या चिमुकलीवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली. तिला तातडीने पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, उपचार करूनही तिचा डावा डोळा निकामी झाल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात येत असून पुढील उपचारासाठी तब्बल १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आहे.

याच पिसाळलेल्या कुत्र्याने शिवराज बोराटे (वय ४ वर्षे) याच्यावरही हल्ला केला. त्याच्या हाताला, कानाला आणि मानेला चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. तसेच आनंद सानप (वय २१ वर्षे) याच्या कमरेला कुत्र्याने चावा घेतल्याने तोही जखमी झाला.

 

हल्लेखोर कुत्र्याचा शोध सुरू
घटनेनंतर परिसरातील तरुणांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. मात्र, अद्याप हा कुत्रा हाती लागलेला नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुत्रा पुन्हा कोणावर हल्ला करणार नाही ना, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.

कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याचा आरोप
जामखेड शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे आणि अस्वच्छता वाढल्याने भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दररोज भटक्या कुत्र्यांबाबत २० ते २५ तक्रारी येत असल्याचा दावा करण्यात येत असूनही प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

नगरपरिषदेकडे आवश्यक यंत्रणा अपुरी असल्याचे कारण सांगितले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. मात्र, आता चिमुकलीच्या डोळ्याला गंभीर इजा झाल्यानंतर तरी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी जोर धरत आहे.

नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, पिसाळलेल्या कुत्र्यांचा शोध, शहरातील कचऱ्याची नियमित विल्हेवाट आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जामखेडकरांतून होत आहे. विशेषतः शाळकरी मुले, लहान बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

एका दीड वर्षाच्या चिमुकलीच्या डोळ्यावर कायमस्वरूपी परिणाम करणाऱ्या या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का? भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवाल जामखेडकरांकडून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!