Home ताज्या बातम्या जामखेड हादरले! नान्नजमध्ये मध्यरात्री धाडसी जबरी चोरी! महिलेच्या गळ्याला कोयता, चार...

जामखेड हादरले! नान्नजमध्ये मध्यरात्री धाडसी जबरी चोरी! महिलेच्या गळ्याला कोयता, चार महिन्यांच्या बाळाला पायाखाली घेण्याची धमकी देत १४ लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास

0
1
जामखेड हादरले! नान्नजमध्ये मध्यरात्री धाडसी जबरी चोरी!  महिलेच्या गळ्याला कोयता, चार महिन्यांच्या बाळाला पायाखाली घेण्याची धमकी देत १४ लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड हादरले! नान्नजमध्ये मध्यरात्री धाडसी जबरी चोरी!

महिलेच्या गळ्याला कोयता, चार महिन्यांच्या बाळाला पायाखाली घेण्याची धमकी देत १४ लाख ६३ हजारांचा ऐवज लंपास

तालुक्यातील नान्नज येथे मध्यरात्री चार अनोळखी चोरट्यांनी घरात घुसून कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखवत तब्बल १४ लाख ६३ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्याला कोयता लावला, तर चार महिन्यांच्या बाळाला पायाखाली घेण्याची धमकी देत कुटुंबीयांना गप्प केले. या धाडसी जबरी चोरीच्या घटनेने नान्नजसह संपूर्ण जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौ. मनिषा श्रीमंत गोरे (वय ४६, व्यवसाय शिलाईकाम व शेती, रा. शिवाजीनगर, मदरसा जवळ, नान्नज) यांनी जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.तक्रारीनुसार, घटनेच्या वेळी मनिषा गोरे या आपल्या चार महिन्यांच्या जुळ्या नातवंडांपैकी एका बाळासोबत बेडरूममध्ये झोपल्या होत्या. त्यांचे पती श्रीमंत गोरे, मुलगा अक्षय गोरे, सून प्रतीक्षा गोरे आणि दुसरे जुळ्या बाळ दुसऱ्या खोलीत झोपले होते. पहाटे दोनच्या सुमारास बेडरूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आवाज आल्याने मनिषा गोरे यांना जाग आली.

दरवाजाची कडी तोडून तोंडाला मास्क लावलेले चार चोरटे घरात घुसले. त्यापैकी दोघांनी मनिषा गोरे यांच्या गळ्याला कोयता लावून आरडाओरड न करण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या जवळ झोपलेल्या चार महिन्यांच्या बाळाला पायाखाली घेण्याची धमकी देत त्यांना भयभीत केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील व कानातील दागिने हिसकावून घेतले. कानातील झुमके ओढल्याने त्यांच्या उजव्या कानाच्या पाळीलाही दुखापत झाली.

कुटुंबीयांना धमकावत कपाटातील दागिने काढून घेतले
यानंतर चोरट्यांपैकी दोघांनी घरातील अन्य सदस्यांना धमकावत कपाटातील दागिने काढून घेतले. चोरट्यांनी घरातील कपाटे उचकटून सोन्याचे हार, नाकातील रिंग, कर्णफुले, साखळी, अंगठ्या, चांदीच्या पायातील पट्ट्या आदी दागिने असा सुमारे १३ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज आणि दीड लाख रुपये रोख असा एकूण १४ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

चोरी केल्यानंतर चोरट्यांनी बेडरूमला बाहेरून कडी लावली आणि कुटुंबीयांनी आवाज केल्यास गंभीर परिणामांची धमकी देत तेथून पलायन केले.
आरडाओरडीनंतर शेजारी धावले; ११२ वर फोन चोरटे निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारील नागरिकांनी तातडीने गोरे यांच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर कुटुंबीयांना बाहेर काढण्यात आले. मनिषा गोरे यांचा मुलगा अक्षय गोरे यांनी तत्काळ ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, मनिषा गोरे यांच्या कानाला दुखापत झाल्याने त्यांच्यावर नान्नज येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मास्कमुळे चोरट्यांची ओळख पटेना
तक्रारीनुसार, मनिषा गोरे यांच्या गळ्याला कोयता लावून दागिने हिसकावणारे दोन चोरटे अंदाजे १८ ते २५ वर्षे वयोगटातील, सडपातळ व बुटक्या बांध्याचे होते. तर पती, मुलगा व सुनेला धमकावत कपाटातील दागिने काढून घेणारे अन्य दोन चोरटे अंदाजे १८ ते २२ वर्षे वयोगटातील, मजबूत बांध्याचे आणि सुमारे ५ फूट ५ इंच उंचीचे असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व चोरट्यांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला असल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत.

श्वान पथक, फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक टीमकडून तपास
घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथक, फिंगरप्रिंट पथक तसेच फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण करण्यात आले. चोरीच्या घटनेतील पुरावे संकलित करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात आले.

या धाडसी जबरी चोरीचा तपास सुरू असून, चार अनोळखी चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान जामखेड पोलिसांसमोर उभे राहिले आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे पुढील तपास करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!