जामखेडच्या कला केंद्रातील अंतर्गत वादातून गर्भवती महिलेची निर्घृण हत्या, धुळ्यात पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार!
जामखेड येथील ‘सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रा’तील अंतर्गत वादातून ३१ वर्षीय गर्भवती महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंकी काटकर (मूळ रा. रायगड) असे मृत महिलेचे नाव असून, ती जामखेड येथील कला केंद्रात काम करत होती. या प्रकरणाचा तपास करताना धुळे पोलिसांनी तब्बल ११ तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून हत्येचा छडा लावला. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पिंकी काटकर हिचा कला केंद्रातील काही व्यक्तींशी अंतर्गत वाद झाला होता. या वादातून आरोपींनी तिचे अपहरण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील एका घरात नेऊन मारहाण करण्यात आली. मारहाणीत ती बेशुद्ध पडली. आरोपींना ती मृत झाल्याचे वाटल्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह चारचाकी वाहनात टाकून राजस्थानच्या दिशेने जाण्याचे ठरवण्यात आले.
मात्र, प्रवासादरम्यान धुळे-सोलापूर महामार्गावरील गरताड बारी परिसरातील डोंगराळ आणि निर्जन भागात वाहन थांबवण्यात आले. तेथे पिंकीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
जळालेल्या मृतदेहामुळे तपासाला सुरुवात गरताड बारी परिसरात एका महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेहाजवळ ज्वलनशील पदार्थही आढळून आला. याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शवविच्छेदन अहवालात मृत महिला गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. तसेच तिला जाळून मारल्याचे समोर आले. मात्र, मृत महिलेची ओळख पटत नसल्याने तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.
११ तासांचे सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचा दुवा धुळे पोलिसांनी प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. महामार्गावरील विविध ठिकाणचे तब्बल ११ तासांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. या तांत्रिक तपासादरम्यान एक संशयास्पद चारचाकी वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. वाहनाच्या हालचाली, मार्ग आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला. तपासाची दिशा अखेर अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडकडे वळली.
जामखेडच्या ‘सप्तसूर’मध्ये पोलिसांची धडक संशयित वाहनाचा संबंध जामखेडशी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर धुळे पोलिसांनी जामखेड गाठले. पोलिसांनी ‘सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रा’त कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणात सरफराज उर्फ शफिक अलीम मोमीन, आरिफ उर्फ खुज्या आसीफ शेख, स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे आणि लक्ष्मी बालाजी पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, फारुख शेख आणि रोहिणी जाधव हे दोन आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे.
अंतर्गत वादातून हत्येपर्यंतचा घटनाक्रम उलगडणार गर्भवती महिलेच्या हत्येने जामखेडसह धुळे आणि बीड परिसरात खळबळ उडाली आहे. पिंकी काटकर हिचे अपहरण नेमके कशासाठी करण्यात आले, वादाचे मूळ कारण काय होते, हत्येचा कट कोणी रचला आणि या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेज, वाहनाची हालचाल आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला असून, फरार आरोपींच्या अटकेनंतर या हत्याकांडामागील संपूर्ण घटनाक्रम अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.