शासकीय रेखाकला परीक्षेसाठी जामखेड तालुका सज्ज, १,४३४ विद्यार्थी देणार परीक्षा ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड केंद्रावर सर्वाधिक ८५४ विद्यार्थी, २८ सप्टेंबरपासून चार दिवस परीक्षा
शासकीय रेखाकला परीक्षेसाठी जामखेड तालुका सज्ज, १,४३४ विद्यार्थी देणार परीक्षा
ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड केंद्रावर सर्वाधिक ८५४ विद्यार्थी, २८ सप्टेंबरपासून चार दिवस परीक्षा
जामखेड तालुक्यात दरवर्षी घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला परीक्षा २०२६ साठी तालुक्यातील तीनही परीक्षा केंद्रांची तयारी पूर्ण झाली असून, यंदा एकूण १ हजार ४३४ विद्यार्थी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेला सहभागी होत आहेत. या परीक्षा २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चार दिवसांत संपन्न होणार आहेत.
जामखेड तालुक्यात शासकीय रेखाकला परीक्षेसाठी ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड, खर्डा इंग्लिश स्कूल, खर्डा आणि नंदादेवी विद्यालय, नान्नज अशी तीन परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
यामध्ये ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड केंद्रावर एलिमेंटरीचे ४७७ व इंटरमिजिएटचे ३७७ असे एकूण ८५४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या केंद्राचे केंद्रप्रमुख प्राचार्य बाळासाहेब पारखे असून उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, मार्गदर्शक रामचंद्र होशिंग आहेत. केंद्रचालक म्हणून कलाशिक्षक मुकुंद राऊत व श्रीमती संगीता दराडे काम पाहणार आहेत.
खर्डा केंद्रावर एलिमेंटरीचे १८६ व इंटरमिजिएटचे १११, असे एकूण २९७ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कलाशिक्षक रवींद्र कोरे, मजहर सय्यद व जाधव सर तर मुख्याध्यापक गदादे सर परीक्षा कामकाज पाहणार आहेत.
नान्नज केंद्रावर एलिमेंटरीचे १६८ व इंटरमिजिएटचे ११५, असे एकूण २८३ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. कलाशिक्षक संतोष म्हस्के व प्रकाश मिंड असून मुख्याध्यापक दशरथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा पार पडणार आहे.
चार दिवसांत चार विषयांची परीक्षा एलिमेंटरी परीक्षा २८ व २९ सप्टेंबर रोजी होणार असून, पहिल्या दिवशी वस्तुचित्र व रचनाचित्र, तर दुसऱ्या दिवशी संकल्पचित्र तसेच भूमिती व अक्षरलेखन या विषयांचे पेपर होतील. इंटरमिजिएट परीक्षा ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी होणार असून, दोन दिवसांत चार विषयांचे पेपर घेतले जाणार आहेत.
शासकीय रेखाकला परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्र मिळते. तसेच ए, बी व सी श्रेणीतील विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत अनुक्रमे ७, ५ व ३ वाढीव गुणांचा लाभ मिळतो. याशिवाय कला क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम व पुढील शिक्षणासाठी एलिमेंटरी व इंटरमिजिएटची शासकीय प्रमाणपत्रे उपयुक्त ठरतात.
परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी चारही पेपरला उपस्थित राहणे आवश्यक असून, एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा एकाच वेळी देता येत नाहीत. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या कलाक्षेत्राची ओळख होण्याबरोबरच रंगरेषांचे ज्ञान, निरीक्षणशक्ती, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि सर्जनशीलता विकसित होण्यास या परीक्षेचा फायदा होतो.
केंद्र क्रमांक १०८००६, ल. ना. होशिंग विद्यालय जामखेड येथे अध्यक्ष संतोष देशमुख, बाबासाहेब धनवडे, सचिन शेटे, बन्सी सावंत भाऊसाहेब, निलेश भोसले, साई भोसले, अनिल काळे, संजय जाधव, संजय सरडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परीक्षा कामकाजात सहभागी होणार आहेत.
जामखेड तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक तयारी पूर्ण झाली असून, परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख, शिक्षक व आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.