जामखेड न्युज – – – – –
जामखेडकर थक्क! डीजे नाही, डॉल्बी नाही… फक्त टाळ-मृदंगाचा दणदणाट
बैलगाडीत हिंदवी स्वराज्य युवा प्रतिष्ठानची बाप्पाचे शाही विसर्जन

गणेशोत्सव म्हटले की सध्या डीजे-डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात निघणाऱ्या मिरवणुका सर्वत्र पाहायला मिळतात. मात्र, या आधुनिक धामधुमीला फाटा देत हिंदवी स्वराज्य युवा प्रतिष्ठानने पारंपरिक संस्कृतीचा आदर्श जपत बैलगाडीतून टाळ-मृदंगाच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक काढली. या आगळ्यावेगळ्या मिरवणुकीने जामखेडकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

हिंदवी स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पांडुरंग भोसले व मनसेचे प्रदीप टाफरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीपूर्वी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती करण्यात आली.

यानंतर सजवलेल्या बैलगाडीत श्री गणेशाची मूर्ती विराजमान करून टाळ-मृदंगाच्या गजरात व वारकरी मंडळाच्या सहभागाने मिरवणुकीला सुरुवात झाली. भक्तिमय वातावरण, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि वारकरी परंपरेचा जागर यामुळे मिरवणुकीला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. डीजे- डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन करण्याचा प्रतिष्ठानचा उपक्रम उपस्थितांसाठी कौतुकाचा विषय ठरला.

तरुणाईने आधुनिकतेसोबतच आपल्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करावे आणि उत्सवातून सामाजिक व सांस्कृतिक संदेश द्यावा, असा आदर्श या मिरवणुकीतून हिंदवी स्वराज्य युवा प्रतिष्ठानने निर्माण केला.




