जामखेड न्युज – – – – –
पाण्यासाठी जामखेडकरांची वणवण थांबवा! सभापती राम शिंदेंचे प्रशासनाला कडक निर्देश, टँकर प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे आदेश
नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी शहराच्या पाणीप्रश्नाकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले

तालुक्यात निर्माण झालेल्या टंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि तत्परतेने काम करावे, असे निर्देश महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. ना. प्रा. राम शिंदे यांनी दिले.

पाणीटंचाईच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जामखेड शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील पाणीपुरवठा, उपलब्ध जलस्रोत, टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि भविष्यातील संभाव्य टंचाई याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या सुरुवातीला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्रांजलताई अमितभाऊ चिंतामणी यांनी जामखेड शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी तसेच गंभीर बनत चाललेल्या पाणीप्रश्नाकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले. शहरातील विविध भागांमध्ये पाण्याची उपलब्धता, पाणीपुरवठ्याचे नियोजन आणि नागरिकांच्या वाढत्या गरजा याबाबत त्यांनी प्रशासनासमोर वस्तुस्थिती मांडली.

टँकर प्रस्तावांना विलंब नको
टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेत उपलब्ध व्हावे यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव तातडीने तयार करून ते निधीसह मंजूर करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. केवळ प्रस्ताव तयार करून न थांबता प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही जलदगतीने करण्यावर भर देण्यात आला.




